सातारा : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाऊंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत सातारा येथील शाहू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने साताराजिल्ह्याची वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या खास संमेलन गीताची निर्मित करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (दि. २१) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे सदस्य किशोर बेडकीहाळ, मावळा फौंडेशनचे सदस्य अनिल जठार, तुषार महामुलकर, ज्योती कुलकर्णी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेचे अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. राजेंद्र माने, अजित साळुंखे, विक्रम पाटील, संजय माने, वजिर नदाफ, सचिन सावंत, अमर बेंद्रे, आर. डी. पाटील, अश्विनी जठार उपस्थित होते. सुमारे ३२ वर्षांनंतर संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सातारकरांना मिळाला आहे.
गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दुपारी ३:३० वाजता ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून या प्रसंगी जनता सहकारी बँक लि. साताराचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सातारा येथील प्रसिद्ध उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता कवीकट्ट्याचे उद्घाटन होणार असून या प्रसंगी साहित्य परिषद सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ आणि सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी ४:१५ वाजता पुण्यातील उद्योजक संदिप शहा यांच्या हस्ते गझलकट्ट्याचे उद्घाटन होणार आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि., शेंद्रे साताराचे चेअरमन व संचालक मंडळ सदस्यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी ४:१५ वाजता संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्र्वास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. सायंकाळी ४:३० वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून दिंडीचा शुभारंभ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी ७ वाजता सातारा जिल्हयातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा सन्मान ९८व्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत. रात्री ८:३० वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संत साहित्याला अभिवादन करण्यासाठी 'बहुरूपी भारुड' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात डॉ. भावार्थ देखणे, अवधूत गांधी, पांडुरंग पवार आणि सहकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. स्वानंद बेदरकर निरूपण करणार आहेत. या प्रसंगी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मंडप क्रमांक १ येथे संमेलनाचे उद्घाटन मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, पूर्वाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उद्योग व मराठी भाषामंत्री ना. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री, स्वागताध्यक्ष ना. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, संमेलन संरक्षक व ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्वजित कदम यांच्यासह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनिताराजे पवार यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले करणार आहेत.
मंडप क्रमांक १ येथे दुपारी ३ वाजता अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कविसंमेलन रंगणार आहे. यात सुनील उबाळे, डॉ. रमेश रावळकर, डी. के. शेख, संगीता माने, अनिता येलमटे, गौतम सूर्यवंशी, आदित्य दवणे, ज्योती कपिले, दिपाली वझे, कमलाकर राऊत, मनोज वराडे, प्रदीप देशमुख, चुडामण बल्हारपूरे, प्रशांत पनवेलकर, सुनील यावलीकर, डॉ. विजय काळे, विवेक सावरीकर, कविता आमोणकर, त्रिवेणी शिर्के, कावेरी दाभडकर, संदीप देशमुख, ज्योती कुलकर्णी, कांता नलावडे, किरण येले, लक्ष्मीकांत रांजणे, सागर काकडे, विलास पिसाळ, सुनील जवंजाळ, सविता पोतदार, अरुण बोऱ्हाडे, प्रभाकर शेळके, कैलास गांधी यांची सहभाग असणार आहे. सूत्रसंचालन प्रदीप कांबळे करणार आहेत.
दुपारी ३ ते ५ या कालावधीत बालकुमार वाचक कट्ट्यावर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल. म. कडू आणि एकनाथ आव्हाड बालकुमार वाचकांशी संवाद साधणार आहेत.
मंडप क्रमांक २ येथे दुपारी ३ वाजता 'जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे?' या विषयावर परिचर्चा होणार असून त्यात संजीव कुलकर्णी, क्षुभा साठे, अमृता तांदळे, राजीव श्रीखंडे, रोहन चंपानेरकर, डॉ. मनोज कामत यांचा सहभाग आहे. त्यांच्याशी संदीप तापकीर संवाद साधणार आहेत. तर निवेदन राजेश सोळसकर यांचे आहे. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता 'मराठी कोशवाङ्मय आणि विस्ताराच्या दिशा' या विषयावर परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी डॉ. राजा दीक्षित आहेत. डॉ. साहेब खंदारे, डॉ. नीलिमा गुंडी, मांगिलाल राठोड, प्रमोद पाटील, अविनाश कोल्हे सहभागी होणार आहेत. जगतानंद भटकर त्यांच्याशी संवाद साधणार आहे. निवेदन सपना डफळे यांचे आहे.
रात्री ८ वाजता मंडप क्रमांक १ येथे सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या गौरी थिएटर्स निर्मित प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित 'शिकायला गेलो एक' या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. नाटकाची मूळ कथा द. मा. मिरासदार यांची आहे. लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर, नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अशोक पत्की, प्रकाश योजना किशोर लंगळे यांचे असून सूत्रधार अजय कासुर्डे आहेत. ऋषिकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा भगरे, समृद्धी मोहरीर, चिन्मय माहूरकर यांच्या भूमिका आहेत. शोभा शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९ वाजता कथाकथन होणार असून यात राजेंद्र गहाळ, माधवी घारपुरे, बाबा परीट, रवींद्र कोकरे, कल्पना देशपांडे सहभागी होणार आहेत. निवेदन मोहन गुरव यांचे आहे. सकाळी ११ वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत होणार असून डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. प्रवीण बांदेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता ज्येष्ठ लेखक प्रकाशक सन्मान कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड तसेच सुविद्या प्रकाशनाचे बाबुराव मैंदर्गीकर, सोलापूर यांचा सत्कार ना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यसभा खासदार नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत. समकालीन पुस्तकांवर दुपारी ४ वाजता चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात अमोल पालेकर लिखित ' ऐवज : एक स्मृतिबंध' या पुस्तकावर संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यात अमोल पालेकर यांच्यासह संध्या गोखले आणि वृंदा भार्गवे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता 'आजच्या मराठी समाजाची विचार भ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती' या विषयावर विनय हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून प्रमोद काळबांडे, शाळीग्राम निकम, डॉ. संभाजी पाटील, अॅड. धनंजय वंजारी, हेरंब कुलकर्णी, यशवंत पाटणे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. संवादक प्रशांत कदम असून हणमंत पाटील यांचे निवेदन आहे. रात्री ८ वाजता हास्यजत्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लेखक व निर्माते सचिन मोटे असून दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी आहेत. समीर चौगुले, ओंकार राऊत, चेतना भट, दत्तू मोरे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, अरुण कदम, प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बने, वनिता खरात, प्रभाकर मोरे, रोहित माने, प्रथमेश शिवलकर यांचा सहभाग आहे.
बालकुमार वाचक कट्टा येथे सकाळी ११ ते १ या वेळात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक संगीत बर्वे, राजीव तांबे हे बालकुमार वाचकांशी संवाद साधणार आहेत. तर दुपारी ३ वाजता गणेश घुले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता 'आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?' या विषयावर परिचर्चा होणार असून यात डॉ. गणेश मतकरी, प्रवीण टोकेकर, हृषीकेश गुप्ते, डॉ. गोविंद बुरसे, डॉ. राजेंद्र राऊत यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी जयदीप पाठकजी संवाद साधणार असून श्रीकांत कात्रे यांचे निवेदन आहे. दुपारी ४ वाजता 'स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना' या विषयावर डॉ. गीताली वि. म. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवादात सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, हिना कौसर खान, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या अणवेकर, डॉ. अंजली ढमाळ,
कीर सहभागी होणार आहेत. निवेदन वैदेही कुलकर्णी करणार आहेत. सायंकाळी ६ वाजता 'अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने' या विषयावर परिचर्चा होणार असून यात श्रीधर लोणी, पी. विठ्ठल, डॉ. सुभाष उगले, श्याम जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. चैत्री साळुंके, डॉ. अस्मिता हवालदार यांचा सहभाग असणार असून त्यांच्याशी डॉ. महेश गायकवाड संवाद साधणार आहेत. रविवार, दि. ४ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता लेखक शाहू पाटोळे लिखित 'अन्न हे अपूर्णब्रह्म' या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली असून त्यात पाटोळे यांच्यासह राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे, भूषण कोरगावकर सहभागी होणार आहेत. सकाळी ११:३० वाजता लोकसत्ताचे संपादक आणि ख्यातनाम लेखक गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशी पत्रकार प्रसन्न जोशी आणि लेखक किशोर बेडकीहाळ संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखली दुसरे निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. यात संजीवनी बोकील, किसन पवार, निरुपमा महाजन, माधव हुंडेकर, नामदेव वाबळे, बाळासाहेब गरकळ, विठ्ठल काष्टे, व्यंकट अनेराये, डॉ. कैलास दौंड, शिवाजी जोगदंड, गोपाळ नेरकर, मधुकर जाधव, अनुराधा नेरूरकर, विजय ढाले, सायमन मार्टिन, कीर्ती पाटसकर, मंदाकिनी पाटील, सुजाता राऊत, रामदास खरे, दिपाली दातार, राजेंद्र वाघ, धनाजी घोरपडे, ज. तु. गार्डे, आराधना गुरुव, राकेश शेटे, संगीता केंजळे, सायली कुलकर्णी, शरद कोकास, दशरथ परब, मनिषा खरगोणकर, प्रकाश धर्मा, धनश्री पाटील यांचा सहभाग असून सूत्रसंचालन वैशाली राजमाने करणार आहेत.
मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता 'बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात दिसत का नाही?' या विषयावर भूषण कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात चंद्रकांत दळवी, श्रीकांत पाटील, भगवान काळे, चांगदेव काळे, राजेश शेगोकार यांचा सहभाग असणार आहे. निवेदन हरिष पाटणे यांचे आहे. दुपारी १:३० वाजता 'संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी' हा संवादात्मक कार्यक्रम होणार असून यात प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सदानंद देशमुख, नीरजा, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत, अभिराम भडकमकर हे कादंबरीकार सहभागी होणार असून त्यांच्याशी राजेंद्र माने आणि निलेश महिगांवकर संवाद साधणार आहेत. निवेदन अॅड. चंद्रकांत बेबले करणार आहेत.
मंडप क्रमांक १ येथे दुपारी ४:३० वाजता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता होणार असून या प्रसंगी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री ना. एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन संरक्षक व ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, साताऱ्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, रोजगार हमीमंत्री ना. भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले करणार आहेत. महाराष्ट्रातील लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा फोक अख्यान हा कार्यक्रम मंडप क्रमांक १ येथे रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. निर्मिती रणजीत गुगळे आणि भूषण मेहरे यांची असून निर्मिती, मूळ संकल्पना, संगीत कारभारी, हर्ष-विजय यांची आहे. कार्यक्रमाची बांधणी लमाण बंधू, ईश्र्वर अंधारे यांची आहे.