राधिका चौकात दोन वाहनांची जोरदार धडक, दोघे जखमी

मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचा आरोप; शाहूपुरी पोलिसांकडून चालकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 July 2026


सातारा : शहरातील राधिका चौक येथे मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघेजण जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी बलेनो कार चालक सागर शिवाजी माने (रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दिलीप शिंदे (वय 32, रा. कीर्ती पार्क, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. शुभम शिंदे हे मित्रांसह अक्षय मनोहर भोसले यांच्या मालकीच्या टाटा टिगोर (एमएच 11 डीएच 1771) या कारमधून पुणे येथील भक्ती शक्ती संगम सोहळा आटोपून सातार्‍याकडे परतत होते.

दरम्यान, 10 जुलै रोजी रात्री सुमारे पाऊण वाजण्याच्या सुमारास राधिका चौक येथे एसटी स्थानकाच्या दिशेने भरधाव आलेल्या मारुती सुझुकी बलेनो (एमएच 11 डीए 6276) या कारने टिगोर कारला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की टिगोर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबावर जाऊन आदळली, तर बलेनो कारही पुढे जाऊन दुसर्‍या खांबाला धडकली.

या अपघातात शुभम शिंदे यांच्या उजव्या गुडघ्याला, तर गणेश केंजळे यांच्या डाव्या हाताला व कानाला दुखापत झाली. टिगोर कारच्या इंजिन, बोनेट, चेसिस, रेडिएटर, स्टेअरिंग, चाके आणि एअरबॅगसह विविध भागांचे मोठे नुकसान झाले.

फिर्यादीनुसार, अपघातानंतर बलेनो चालक वाहनातून खाली उतरला असता त्याच्या तोंडातून मद्याचा वास येत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगमनगर परिसरातील घरफोडीत 56 हजारांचा ऐवज लंपास
पुढील बातमी
कराडात अवैध अग्नीशस्त्र विक्रीचा डाव हाणून पाडला

संबंधित बातम्या