महाबळेश्वर : देवभूमी उत्तराखंड येथे पर्यटनास गेल्यानंतर ढगफुटीमुळे अडकलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव व कुटुंबीयांना स्थानिक प्रशासन व एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवल्याने महाबळेश्वरवासीयांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, सुरक्षितस्थळी हलवल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन धार्मिक पर्यटनासाठी कुटुंब रवाना झाल्याची माहिती आकाश जाधव यांनी दिली.
उत्तराखंडमधील यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी परिसरात झालेली ढगफुटी व जोरदार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील जाधव कुटुंबातील सहा सदस्यांसह राज्यातील सुमारे 150 पर्यटक अडकून पडले. परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्याने त्यांना परत येता येत नव्हते. नद्यांना प्रचंड पूर येऊन रस्ते बंद झाले. अशा भयावह परिस्थितीत तेथे अडकलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड गावातील जाधव कुटुंबीयांसह राज्यातील पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धावून गेले. ना. शिंदे यांनी जाधव कुटुंबीयाशी संपर्क करून धीर दिला.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंतीदेखील केली. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने धाव घेवून या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. ना. एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी पराग दकाते यांच्याशीदेखील संपर्क साधत या पर्यटकांना मदत करण्याची त्यांना विनंती केली. त्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशीही फोनवरून संवाद साधत या पर्यटकांपर्यंत मदत पोहचवण्याची विनंती केली.
महाबळेश्वर तालुक्यातील झांजवड गावातील संभाजी जाधव व कुटुंबियांसोबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देखील अपुलकीने संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली व धीर दिला. सायंकाळी एनडीआरएफच्या जवानांनी यमुनोत्री धामच्या जानकीचट्टी गावात अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपरित्या सुरक्षित ठिकाणी हलवले. यानंतर कुटुंब सदस्य आकाश जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह उत्तराखंड प्रशासन व सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.