मुंबई : सुनेत्रा पवार यांनी आज राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यामुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. मात्र, शपथविधी सोहळ्यात पार्थ पवार कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता यामागचे कारण समोर आले आहे.
बारामतीत थांबण्यामागचं कारण काय?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबीयांनी पार्थ पवार यांना बारामतीतच थांबवले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू असलेल्या काही कौटुंबिक विधी आणि पुढील कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीच पार्थ पवार यांना मुंबईला न येण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार पार्थ पवार बारामतीतच थांबले असल्याचे समजते.
अर्थखातं सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही
शपथविधीनंतर अवघ्या काही वेळातच खातेवाटप जाहीर करण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास तीन खाती देण्यात आली आहेत. मात्र, अर्थखातं सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे खाते स्वतःकडेच ठेवण्यासाठी भाजप आग्रही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही अर्थखात्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे या खात्याबाबत पुढे काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी अर्थखातं मुख्यमंत्र्यांकडेच राहणार असल्याचे संकेत आहेत.