सातारा : सातारा जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने सातारा तालुक्यात आयटी पार्क उभारण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. नागेवाडी येथील ४२ हेक्टर ५५ आर इतकी शासकीय जमीन आयटी पार्कसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) वर्ग करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे साताऱ्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग आता प्रशस्त झाला असून, ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांचे आभार मानले आहेत.
सातारा जिल्ह्यातील आयटी क्षेत्रातील हजारो तरुण-तरुणींना नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा परराज्यात जावे लागते. हे स्थलांतर थांबावे आणि साताऱ्याच्या औद्योगिक वैभवात भर पडावी, यासाठी नागेवाडी (लिंब खिंड) येथील शासकीय जागेत आयटी पार्क उभारण्याची मागणी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या सूचनेनुसार काही दिवसांपूर्वीच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी या जागेची तांत्रिक पाहणी केली होती. त्यानुसार उद्योग विभागाने नागेवाडी येथील गट नं. ३०८/१ मधील ४२.५५ हेक्टर क्षेत्र आयटी पार्कसाठी आरक्षित केले होते. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी ही जमीन महसूल विभागाकडून एमआयडीसीकडे हस्तांतरित होणे आवश्यक होते.
मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या जमिनीच्या हस्तांतरणास अधिकृत मान्यता देण्यात आली. महसूल विभागाने हे क्षेत्र एमआयडीसीला प्रदान केल्याने आयटी पार्कच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत. आयटी पार्कची पुढील प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या या निर्णयाचे सातारा जिल्ह्यातून स्वागत होत आहे.