रॉकेल वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर दुकानदार संघटना आक्रमक; पुरवठा अधिकाऱ्यांकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा :  जिल्ह्यातील रॉकेल वितरण प्रक्रियेत अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करत रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन धारक संघटनेने जिल्हा पुरवठा विभागाकडे धाव घेतली. अपुरा कोटा, अल्प कमिशन आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे रॉकेल वितरण व्यवहार्य राहत नसल्याचे सांगत संघटनेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देत सध्याच्या वितरण पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून मिळणारा रॉकेल कोटा अत्यल्प असल्याने सर्व शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार पुरवठा करणे अशक्य बनले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत असून त्याचा थेट परिणाम दुकानदारांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

रॉकेल विक्रीवर मिळणारे कमिशन अत्यंत कमी असल्याने वाहतूक, साठवण आणि वितरणाचा खर्च भागविणे कठीण जात असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तालुकानिहाय अंतर आणि वाढते इंधन दर यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

तसेच ग्राहकांनी महागड्या दरामुळे रॉकेल खरेदी टाळल्यास उरलेल्या साठ्याचे व्यवस्थापन कसे करायचे, याबाबत शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली. रॉकेलचा नियमित आणि पूर्ण कोटा उपलब्ध करून देण्याबरोबरच पुरवठा प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची आवश्यकता असल्याचेही शिष्टमंडळाने अधोरेखित केले.

यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना. जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने ग्रामीण विकासाचा बिगुल; फडणवीस-शिवराज चौहान यांच्या होणार उपस्थितीत ५ लाख घरांचे लोकार्पण ; १५ मे रोजी महायुतीचे साताऱ्यात राजकीय शक्तिप्रदर्शन
पुढील बातमी
पर्यायी सांस्कृतिक राजकारण स्त्रियांच्या खांद्यावरुन येईल, ते सर्वांनाच मिळून आणावं लागेल : लोकशाहीर संभाजी भगत, १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा समारोप उत्साहात

संबंधित बातम्या