घटस्फोटासाठी दबाव टाकत विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा, मारहाण, धमक्या आणि बदनामी केल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 13 May 2026


सातारा : सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत घटस्फोटासाठी दबाव आणल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मंगळवार पेठेतील ३८ वर्षीय विवाहितेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती समीर बाळकृष्ण कुलकर्णी, सासू कविता बाळकृष्ण कुलकर्णी, सासरे बाळकृष्ण शाहूराव कुलकर्णी (सर्व रा. गजानन नगरी, इटखेडा, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) तसेच आनंद सुज्ञ अंबुलगीकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, पुण्यातील खराडी तसेच पैठण येथील वास्तव्यात आरोपींकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि उपेक्षित वागणूक देण्यात आली. फिर्यादी व त्यांच्या मुलीच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक खर्चही देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच मोबाईलमध्ये तांत्रिक फेरफार करून अनोळखी व्यक्तींना अश्लील संदेश पाठविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर फिर्यादीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत त्यांची बदनामी करण्यात आली. या माध्यमातून घटस्फोटासाठी दबाव आणून मानसिक खच्चीकरण केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप आहे. पतीसोबत संसार करण्याची तयारी दर्शवूनही सासरच्या मंडळींकडून सतत घटस्फोटासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणाचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्य सरकारची मोठी मोहीम; खासगी शाळांवर शिक्षण विभागाचा वॉच, टीईटी पात्रतेची होणार सखोल तपासणी
पुढील बातमी
मैदानातील वाद विकोपाला; दोन गटांमध्ये झालेला वाद हाणामारीपर्यंत, महिलेसोबत गैरप्रकाराची तक्रार

संबंधित बातम्या