कराड : महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान असून, ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी केले. वाठार (ता. कराड) येथील जनसुविधा केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठान आणि रेठरे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा नोंदणी शुभारंभ डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अधिकराव पाटील होते.
व्यासपीठावर माजी जि. प. सदस्या सौ. शामबाला घोडके, रेठरे बुद्रुकचे सरपंच हणमंत सूर्यवंशी, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण धायगुडे, डॉ. विजय गोखले, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटील, कृष्णा बँकेचे संचालक प्रमोद पाटील, सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, प्रकाश पाटील, माणिक पाटील, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, की ७० वर्षे व त्यावरील वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना केंद्रातील मोदी सरकारने ‘आयुष्मान भारत जनआरोग्य योजना’ लागू केली आहे. तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारने ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन याची माहिती द्यावी.
यावेळी डॉ. भोसले यांच्या हस्ते योजनेच्या अर्जांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला आबासाहेब थोरात, सर्जेराव माळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रामराव पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. माजी उपसरपंच शिवाजी दमामे यांनी आभार मानले.
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले
by Team Satara Today | published on : 18 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा