सहा सातारकर धावकांची जैसलमेर-लौगेवालाच्या रणभूमीवर शौर्यदौड; बॉर्डर मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत दमदार कामगिरी

by Team Satara Today | published on : 08 December 2025


सातारा :  1971 च्या भारत–पाक युद्धात फक्त 120 भारतीय सैनिकांनी रात्रभर चाललेल्या भीषण लढाईत आपला शौर्याने देशाला विजय मिळवून दिला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित “द हेल रेस- बॉर्डर रन” जैसलमेर-लौगेवाला येथे 50, 100 आणि 161 किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘द हेल रेस’मध्ये राजस्थानच्या वाळवंटात कडक ऊन व थंडीचा सामना करत सातारच्या धावकांनी दमदार कामगिरी करत100 व 161 किमी बॉर्डर मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या कठीण स्पर्धेत सातर्‍यातील पहिले आयर्नमन डॉ. सुधीर पवार, महावितरण सातारा विभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र भिकू रास्कर (मूळगाव कडेगाव, सांगली; सध्या कृष्णानगर, एमएसईबी येथे कार्यरत), ग्रामविकास अधिकारी विजय सिताराम भिलारे (आरफळ), माजी सैनिक विश्वनाथ क्षीरसागर, चार्टर्ड अकाउंटंट मयुरेश शिंदे, आणि अमर शिंदे (कोंडवे) यांनी सहभाग घेत सातारचा नावलौकिक उंचावला.

शनिवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मॅरेथॉनची सुरुवात झाली. राजस्थानच्या तप्त वाळवंटातील कडक ऊन आणि मध्यरात्रीची चटका लावणारी थंडी अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात धावकांना लढा द्यावा लागला. कठोर नियमावली, मर्यादित वेळ आणि शारीरिक क्षमतेवरची अंतिम मर्यादा गाठतही सातारच्या धावकांनी ही स्पर्धा निर्धाराने पूर्ण केली.

100 किमी साठी 16 तास आणि 161 किमी साठी 28 तासांची निश्चित वेळमर्यादा असूनही सर्व धावकांनी ती यशस्वीरीत्या पाळली. ही तयारी आणि यश डॉ. संदीप काटे सरांच्या नेतृत्वाखाली, तसेच प्रशिक्षक डॉ. सुधीर पवार आणि श्री. जयंत शिवदे यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे धावकांनी सांगितले.

या विलक्षण यशाबद्दल धावकांचे मातोश्री पार्क परिवार, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर (बारामती परिमंडळ), अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर (सातारा), कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के, सातारा हिल रनर्सचे संस्थापक डॉ. संदीप काटे, सातारा रनर्स फाउंडेशन, आणि विविध मान्यवरांनी अभिनंदन करून गौरव केला.

धावकांची स्पर्धेतील कामगिरी

डॉ. सुधीर पवार – 161 किमी : 25 तास 23 मिनिटे

श्री. राजेंद्र रास्कर – 100 किमी : 13 तास 42 मिनिटे

श्री. विजय भिलारे – 100 किमी : 13 तास 42 मिनिटे

श्री. विश्वनाथ क्षीरसागर – 100 किमी : 11 तास 09 मिनिटे

श्री. मयुरेश शिंदे – 100 किमी : 15 तास 30 मिनिटे

श्री. अमर शिंदे – 100 किमी : 15 तास 45 मिनिटे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेधुंद ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना आवरा ; मोकाट कर्कश गाण्यांमुळे अपघाताचा धोका ; ग्रामस्थ हैराण
पुढील बातमी
शाहूनगरमध्ये पाळीव कुत्र्यावर अज्ञाताकडून छ-याच्या बंदुकीतून फायरिंग; घटनेने परिसरात खळबळ

संबंधित बातम्या