मुंबई : राज्यात इंजिनिअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चरसह एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, बी डिझाईन तसेच बीसीए, बीएमएस बीबीए आदी अभ्यासक्रमांसाठी घेत असलेल्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम सीईटी सेलकडून जाहीर केला आहे.
२०२५-२६चे शैक्षणिक सत्र निर्धारित वेळेत सुरू करण्यासाठी सीईटी सेलने तयारी सुरु केली आहे. त्यानुसार विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली सामायिक प्रवेश परीक्षा लवकरच घेण्यासाठी अभ्यासक्रम काय असणार हे जाहीर केले आहे. २०२५ मध्ये होणाऱ्या सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, अशा विषयांच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. तर यंदापासून नव्यानेच सीईटी कक्षाच्या अखत्यारित आलेल्या बीबीए बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठीच्या प्रश्नसंख्येत बदल करण्यात आले आहेत.
प्रामुख्याने सर्वाधिक नोंदणी होत असलेल्या एमएचटी सीईटीतील प्रश्न राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमाशी निगडित असतील. या परीक्षेची गुणदान पध्दत देखील जाहीर केली आहे. कॉम्प्युटर बेस्ड एमसीक्यू पध्दतीने होणार असून, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही. एमएचटी सीईटी परीक्षा प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी जेईई मेन्सच्या बरोबरीची असेल आणि जीवशास्त्राची काठिण्य पातळी 'नीट' परीक्षेच्या बरोबरीची असेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत शास्त्र तीन विषयांसाठी एक-एक नवे प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी आम्ही वेळेत हा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी मुबलक वेळ उपलब्ध होणार आहे. आमच्यासाठी विद्यार्थी हित प्राधान्यावर आहे. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे सीईटी कक्षाने अधिसूचनेत म्हटले आहे.
बीबीए, बीसीएच्या अभ्यासक्रमांसाठी असलेल्या दोन पेपरच्या प्रश्नांच्या संख्येत यंदा बदल करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ज्या पेपरमध्ये ४० प्रश्न होते, त्या पेपरमध्ये यंदा ३० प्रश्न असणार आहेत. तर, ३० प्रश्न असलेल्या पेपरमधील प्रश्नांची संख्या ४० केली जाईल. लॉजिकल रिझनिंग, अॅब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वाण्टिटेटिव्ह अॅप्टिट्यूड आणि व्हर्बल अॅबिलिटी या चार विषयांवर २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे.