सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणात ५५१७ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून जलसाठा ९.८७ टीएमसीवर पोहोचला आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे दमदार पावसाची नोंद झाली.
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. धरणात प्रतिसेकंद ५५१७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कालच्या तुलनेत आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी (Koyna Dam rainfall today) लावली. दरम्यान, कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
काल सकाळपासून हलक्या स्वरूपाच्या पडणाऱ्या पावसाने दुपारनंतर जोरदार हजेरी लावली. घाटमाथा, पाथरपुंज व कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. परिणामी, कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून, प्रतिसेकंद धरणात ५५१७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.
धरणातील पाणीसाठा ही वाढला असून, ९.८७ टीएमसीवर पोहोचला आहे. गेल्या बारा तासांत पाणलोट क्षेत्राच्या कोयना ८९, नवजा १२८ व महाबळेश्वरला ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर एक जून ते आजपर्यंत एकूण कोयना ३५०, नवजा ५०७ व महाबळेश्वर येथे ४४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.