अमितदादा कदम यांनी घेतली शरद पवारांची भेट

विधानसभा निवडणूक लढवण्याची केली इच्छा व्यक्त

by Team Satara Today | published on : 22 September 2024


सातारा : राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शरद पवार यांची भेट घेतली आणि आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्यामुळे आपल्याला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे, अशी थेट इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मागणीला पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे.
यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे तसेच अमितदादा कदम यांचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. अमितदादा कदम यांनी शरद पवार यांची येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेतली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते. आपण सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यात इच्छुक आहोत. या मागणीचा आपण सकारात्मकतेने विचार करावा, अशी मागणी अमितदादा कदम यांनी शरद पवार यांच्याकडे केली. शरद पवार बोलताना म्हणाले, यासंदर्भातील आपल्याला पुरेपूर माहिती आहे. या संदर्भात लवकरच योग्य वेळी चर्चा करून आपण निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहाबाहेर पत्रकारांनी अमितदादा कदम यांना गाठले व या संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, मी शरद पवार यांची आज भेट घेऊन सातारा-जावली विधानसभा मतदार संघासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात सध्या भाजपचे वर्चस्व आहे. येथील कार्यकर्त्याला बळ मिळावे यासाठी राष्ट्रवादीची ताकद निर्माण होणे गरजेचे आहे. सातारा-जावली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा नुकताच आम्ही मेढा येथे घेतला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेण्याची हीच वेळ आहे असे सांगत आपल्याला संपूर्ण पाठिंबा दिला आहे व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी. त्या इच्छेसाठीच मी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे अजित दादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला ताकद देणे, कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहणे याकरता ही निवडणूक लढवणे गरजेचे असल्याचे आपण अजित दादांना यांना सांगितले आहे. दादांनी या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी नकारही दिलेला नाही. अमितदादा कदम यांच्या या पवित्र्यामुळे ते शरदचंद्र पवार गटात जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. आगामी पाच दिवसांमध्ये निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून लवकरच विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात या घडामोडी वेगाने सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने साताऱ्यात अमितदादा कदम यांनी मजबूत मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शरद पवारांची सातारा शहरात 0007 नंबरच्या कारमधून एन्ट्री
पुढील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता

संबंधित बातम्या