सेवानिवृत्तांनी अनुभवाची शिदोरी समाजाला द्यावी - यशेंद्र क्षीरसागर,श्रीमती स्मिता शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

by Team Satara Today | published on : 04 August 2026


सातारा : "सेवानिवृत्त नागरिक हा राष्ट्राचा खूप मोठा ठेवा आहे. त्यांचे अनुभव आणि त्यांची सेवा यांची शिदोरी त्यांनी समाजाला प्रदान करावी. त्यातून समाजाचे प्रबोधन आणि दिशादर्शन होईल,"असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, प्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. 

येथील सातारा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत सांख्यिकी विस्तार अधिकारी श्रीमती स्मिता शिंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील पंचायत समिती तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्प आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यालयातील सांख्यिकी विस्तार अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेतील तसेच पंचायत समिती  मधील कर्मचारी तसेच कुटुंबजन आणि स्नेहीजन उपस्थित होते. 

श्री.क्षीरसागर म्हणाले," प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होताना मन कृतार्थ होते,हे निश्चित आहे .परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे की; जीवनभर आपल्याला मिळालेले भले-बुरे अनुभव समाजाला सेवानिवृत्तांनी जमेल त्या पद्धतीने द्यावे. त्यातून नव्या पिढीला प्रबोधन होईल. श्रीमती शिंदे यांनी अत्यंत सचोटीने, करारीपणे आणि कणखरपणे कर्तव्यदक्ष पद्धतीने सेवा केली. आपल्या अनुभवांचा फायदा समाजाला झाल्यास

काय करावे आणि काय करू नये ,तसेच जीवन सफल कसे बनवता येईल; याचे दिशादर्शन समाजाला होईल. खडतर परिश्रमातून तसेच; अपमान, अवहेलना सहन करीत अनेकांनी संघर्ष करून यश मिळवलेले असते. हा सर्व अनुभव समाजाला कथन केल्यास त्यातून जे मंथन होईल त्यामुळे सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यास मोलाची मदत मिळेल. समाजातील विविध घटकांनी देखील सेवानिवृत्तांची काळजी घ्यावी .त्यांच्याशी स्वतःहून संपर्क करावा आणि समाज शिक्षण प्राप्त करावे. श्रीमती शिंदे यांनी प्रचंड कष्टातून सेवा तर  मनोभावे केलीच .परंतु त्यासोबत नवीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देखील अत्यंत मनापासून केले आणि करीत आहेत. कुटुंबाची मनोभावे सेवा केली. त्यांचा आदर्श केवळ कर्मचारी  नव्हे; तर संपूर्ण समाजाने घ्यावा." 

यावेळी स्मिता शिंदे यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सांख्यिकी विस्तार अधिकारी शाम राठोड यांनी सूत्रसंचालन केले.अनेक वक्त्यांनी गुणवर्णन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

तुम बेसहारा हो तो, किसी का सहारा बनो!

यावेळी यशेंद्र क्षीरसागर यांनी "आशीर्वाद" चित्रपटातील अत्यंत अर्थपूर्ण गीत सादर केले. या गाण्यातली अर्थपूर्णता समय सूचकता,तत्त्वज्ञान सर्वांना भावले. अशोक कुमार, जया भादुरी, सिम्पल कापडिया तसेच बालकांवर चित्रित हे गीत जीवनाचे तत्वज्ञान सांगते.जरी एखादा बेसहारा असेल तरीही त्या व्यक्तीने  इतरांना सहकार्य करायलाच हवे .त्यामुळे स्वतःला सहकार्य आपोआप मिळते. बुडती नाव जर आपण किनाऱ्यावर नेण्यासाठी मदत केली तर आपल्याला सुद्धा किनारा मिळतो. "स्वतःचे दुःख स्वतःलाच भोगावे लागते. परंतु आनंद सर्वांना वाटावा" असा या गीताचा मथीतार्थ आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील जपान कराटे असोसिएशनच्या जकातवाडी येथील नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहात

संबंधित बातम्या