सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये होऊ पाहणाऱ्या ९ नगरपालिका आणि एक नगरपंचायत निवडणूकीसाठी आज सोमवारी उमेदवारांचा अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षानंतर या निवडणुका होत असल्यामुळे काटे की टक्कर होणार हे निश्चित असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने ही निवडणूक रंगतदार होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडे जिल्ह्यात सर्वाधिक जास्त स्टार प्रचारकांची मांदियाळी असून त्यामध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे हुकमी एक्का ठरणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर या नगरपालिका तर मेढा नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकीकडे भाजप नेतृत्वाकडून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. त्यासोबत बहुतांश ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातही तीच परिस्थिती असतानाच आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराची राळ उठणार आहे.
सध्या तरी भाजपाकडे खा. उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, विक्रम पावसकर अशी भली मोठी फौज असून या निवडणुकीतील प्रचारात पक्षश्रेष्ठी खा. उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे या तिघांना ताकतीने उतरवतील अशी अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी भाजपाने महाराष्ट्रात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकीतील प्रचारात खा. उदयनराजे भोसले यांना उतरवले होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. छत्रपती घराण्याचे तेरावे वंशज, राजकीय टोलेबाजी करण्यात असलेला तरबेजपणा आणि आरेला कारे म्हणण्याची क्षमता पाहता उदयनराजे भोसले यांना सातारापुरते मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील अन्य नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात ताकतीने उतरवले जाऊ शकते.
अभयसिंहराजे भोसले यांचा वारसा, प्रश्नांची मुद्देसूद मांडणी, जिल्ह्यातील विकास कामांची जाण, विकास कामांसाठी सातत्याने आग्रही राहणारे नेते म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्ह्यात परिचित आहेत. या बाबी ओळखूनच भाजपाने त्यांचा कॅबिनेट मंत्रीपद देऊन सन्मान केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे विश्वासू ओळखल्या जाणाऱ्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उतरवले जाऊ शकते.
उदयनराजे आणि शिवेंद्रसिहराजे यांच्यातील मनोमिलन पाहता त्यांना सातारमध्ये फार अडकवून न ठेवता जिल्ह्यातील अन्य पालिकांच्या निवडणूक प्रचारात उतरवले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
जयकुमार गोरे यांची ओळख म्हणजे जिल्ह्याची मुलुख मैदान तोफ अशीच आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. रामराजे सभापती म्हणून कार्यरत असताना सुद्धा जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावर राजकीय टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. स्वयंभू नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या जयकुमार गोरे यांना या निवडणुकीत प्रचारासाठी उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांमध्ये खा. उदयनराजे भोसले हे हुकमी एक्का ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अजित पवार गटाची धुरा नितीन आणि मकरंद पाटील यांच्याकडे
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व खा. नितीन पाटील आणि त्यांचे बंधू मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे करत आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून वाई, महाबळेश्वर आणि पाचगणी या नगरपालिका आपल्याकडेच राहाव्यात यासाठी पाटील बंधूंनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची भली मोठ्ठी यादी नसली तरी आ. सचिन पाटील, उदयसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब, संजय देसाई, शिवरूपराजे खर्डेकर, नितीन भरगुडे -पाटील, शिवाजीराव महाडिक, उदय कबुले, सुरेंद्र गुदगे, विक्रमबाबा पाटणकर, प्रदीप विधातेज, किरण साबळे -पाटील यांच्यासारख्या दिग्गज समर्थकांची फौज आहे असे असले तरी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाची धुरा दोन्ही पाटील बंधूंच्यावर आहे.