दुर्गामाता विसर्जन, शाही सीमोल्लंघन सोहळ्यानिमित्त सातार्‍यात वाहतुकीत बदल

बोगदा ते शाहू चौक मार्ग बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : सातारा शहरात मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी दुर्गामाता विसर्जन आणि शाही सीमोल्लंघन सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याला ग्रामीण तसेच शहरी भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले आहेत. हे निर्बंध 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
राजपथावरील कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसेच कमानी हौद ते शेटे चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील शेटे चौक ते शनिवार चौक मार्गे मोती चौक या मार्गांवरही वाहतुकीस बंदी असेल.
मोती चौक, एमएसईबी कार्यालय, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका चौक, दुर्गामाता विसर्जन कृत्रिम तलाव ते कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ या मार्गावरही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय स्टेट बँक, प्रतापगंज पेठ ते डीसीसी बँक, मोती तळे तसेच विठोबाचा नळ ते जलमंदिर या मार्गांवरही वाहतुकीचे निर्बंध असतील.
मोळाचा ओढा ते बुधवार नाका मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका हा रस्ताही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थ मंदिर ते चांदणी चौक आणि बोगदा ते शाहू चौक या मार्गांवर हलक्या व अवजड वाहनांना, तसेच एसटी बसलाही प्रवेश बंद राहणार आहे.
सज्जनगड, कास पठारासाठी पर्यायी मार्ग
सातारा शहरातून सज्जनगड व कास पठाराकडे जाणार्‍या आणि तेथून शहरात येणार्‍या सर्व वाहनांनी गोडोली नाका, शिवराज पेट्रोलपंप, खिंडवाडी, शेंद्रे, सोनगाव फाटा आणि बोगदा या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोळाचा ओढा येथून शहरात येणारी वाहने महानुभव मठ, करंजे आणि भुविकास बँक चौक मार्गे मार्गस्थ होतील. कोटेश्‍वर मंदिर परिसरातून एसटी स्थानकाकडे येणार्‍या वाहनांसाठी कोटेश्‍वर मंदिर, शाहूपुरी, मोळाचा ओढा या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
मोती चौकाकडे जाणारी वाहने शाहू चौक, अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिराकडे वळविण्यात येतील. शेटे चौक, शनिवार चौक आणि जुना मोटार स्टँड परिसरातील नागरिकांनीही मोती चौकाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. कास, यवतेश्‍वर आणि सज्जनगड तसेच सोनगाव फाटा मार्गे शहरात येणार्‍या वाहनांनी शेंद्रे, खिंडवाडी आणि शिवराज पेट्रोलपंप मार्गे शहरात प्रवेश करावा.
दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था
दुर्गामाता विसर्जन आणि शाही सीमोल्लंघन सोहळ्यासाठी येणार्‍या नागरिकांनी आपली वाहने तालिम संघाजवळील मैदान किंवा कोटेश्‍वर मैदान येथे पार्क करावीत. पर्यायी पार्किंगच्या जागांचाही वापर करता येईल.
दुर्गामाता विसर्जन मिरवणूक राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक, राधिका चौक, बुधवार नाका आणि विसर्जन तळे या मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मार्गावरील रहिवाशांनीही आपली वाहने अन्यत्र पार्क करावीत.
रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रात स्वतंत्र आयुष विभाग सुरू करा; आयुर्वेदिक उत्पादकांची मागणी
पुढील बातमी
सातारा शहरातील गोडोली नाका परिसरातील वाहतुकीत बदल; नागरिकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे

संबंधित बातम्या