मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा उडविला जात आहे. अशातच मतदानासाठी काही तास उरलेले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील अनेक ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यासाठीचे नवे वेळापत्रकही आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
येत्या २ डिसेंबर रोजी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार होते. तर ३ डिसेंबरला निकाल होता. पण नगराध्यक्षपदांसह सदस्यपदाच्या काही उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितल्याने या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर न्यायालयात दाखल झालेल्या अपीलांवर विलंबाने निकाल लागल्याने काही निवडणुका ठिकाणच्या पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील बारामतीसह तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचाही त्यामध्ये समावेश आहे. बारामतीतील नगराध्यक्षपदासाठी सात जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तर तळेगावमधील सहा जागांची निवडणूक पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे लोणावळ्यातील दोन प्रभागांच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगपंचायतींच्या निवडणुकाही पुढे ढकलण्याचा निर्णय़ निवडणूक आयोगाने घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेळा नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार नाही. ही निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली आहे, तिथून सुधारित कार्यक्रम राबविला जाईल, असे निवडणूक निर्णय़ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर अपील दाखल कऱण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक पुढे गेली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेतील सहा प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
नांदेडमधील धर्माबाद आणि मुखेड नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलावी लागली आहे. तर भोकर, कुंडलवाडी व लोहा येथील एका-एका जागेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिशदेची निवडणूकही स्थगित झाली आहे. यवतमाळमधील दिग्रस पांढरकवडा आणि वनी येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी आणि अकोल्यातील बाळापूर येथील निवडणुकाही पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. इतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका यापूर्वी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसारही होतील.
सुधारित निवडणूक कार्यक्रम :
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख – ४ डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – १० डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी – ११ डिसेंबर
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – २० डिसेंबर
मतमोजणी – २१ डिसेंबर