सातारा, दि. ९ : बिहार राज्यातील मतदार अधिकारी यात्रेच्या वेळी दरभंगा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने भारताचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल अपमानकारक वल्गना केली. शिवीगाळ केली, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी, लाजिरवाणा आणि समाजातील सौजन्य परंपरा व सुसंस्कृत वर्तणुकीला धक्का लावणार आहे त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, मातृशक्ती, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी आणि विविध हिंदू संघटनांनी केली.
याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आईला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे, अनेक देवी देवताना सुद्धा आपण आई असेच संबोधत असतो, राजकारणात मतभेद असतात पण म्हणून एखाद्याच्या आईला शिवीगाळ करणे ही अत्यंत निंदनीय घटना आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे भारताला संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात त्यांच्या आईबद्दल अत्यंत खालच्या थरावर जाऊन झालेल्या शिवीगाळ आणि इतर वक्तव्य यांचा निषेध करत या घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करावी. अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, समाजातील सौहार्द्य व आदर राखण्यासाठी योग्य ती सार्वजनिक भूमिका जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हा अध्यक्ष विजय गाढवे, दुर्गा वाहिनी सातारा जिल्हा अध्यक्ष अस्मिता लाड, विश्व हिंदू परिषद प्रचार प्रसार प्रमुख प्रमोद मोरे, मातृशक्ती सातारा शहर अध्यक्ष सुवर्णा पाटील, मातृशक्ति सातारा शहर उपाध्यक्ष सीता चव्हाण, बजरंग दलाचे दादासाहेब राजेशिर्के, विश्व हिंदू परिषद या सीमा गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे विकास गोसावी, रवी आपटे, विकास बनकर आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते