छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे विरोधकांनी राजकारण करू नये.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा इशारा.

by Team Satara Today | published on : 27 August 2024


सातारा दिनांक 27 प्रतिनिधी

मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे ही घटना दुर्दैवी आहे मात्र तो एक अपघात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या जागेवर पुन्हा तसाच आणि तितकाच भव्य पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले आहे मात्र विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण करू नये छत्रपती शिवराय हे सर्वांनाच वंदनीय आहेत हा विषय राजकारणाचा नाही असा स्पष्ट इशारा राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे .

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना शंभूराज देसाई पत्रकारांशी बोलत होते पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

छत्रपती शिवरायांचा मालवण येथील सहा महिन्यापूर्वी उभारण्यात आलेला शिवपुतळा कोसळला या प्रश्नावर बोलताना शंभूराजे म्हणाले ही एक दुर्दैवी घटना आहे, मात्र तो अपघात होता, समुद्रकिनाऱ्यावर खाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी 45 किलोमीटर होता पुतळ्याने गंज पकडला होता त्यामुळे हा अपघात झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून त्या जागी तसाच भव्य पुतळा उभारण्याच्या आश्वासन दिले आहे या संदर्भात विरोधकांनी कोणतेही राजकारण करू नये अथवा या विषयाचे भांडवल करू नये. छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला वंदनीय आहेत. महाविकास आघाडीचे नेते वेगवेगळ्या विषयांवर उठ सूट महायुतीच्या तीन घटक पक्षांवर सातत्याने टीका करत असतात त्यांच्या संदर्भात बोलणे योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला.

बदलापूर प्रकरणातील कारवाई संदर्भात आदित्य ठाकरे यांनी महायुती शासनावर टीका केली होती या संदर्भात बोलताना शंभूराज म्हणाले आदित्य ठाकरे स्वतः मंत्री होते पोलीस कारवाई कशी असते याची त्यांना पूर्ण माहिती आहे या प्रकरणांमध्ये संबंधित अपशब्द वापरणाऱ्या इसमावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे, या गुन्ह्याची पडताळणी उपअधीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी करतो यामध्ये तथ्य आढळून आल्यानंतर दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.

यावेळी मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजने बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, या योजेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील एक हजार यात्रेकरूंना महाराष्ट्र तील आणि अन्य राज्यातील तीर्थक्षेत्रांवर सहल घडवली जाणार आहे, यासंदर्भात पालकमंत्र्यांना तीर्थस्थळे सुचवण्याचा अधिकार आहे, यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा करून याबाबतची स्थळे ठरवली जातील असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून एक लाख 87 हजार प्रकरणाची छाननी करण्यात आली आहे, तसेच सात लाख नऊ हजार पात्र लाभार्थी बहिणींना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे 8000 लाडक्या बहिणींचे प्रस्ताव नाकारण्यात आलेले आहेत यामध्ये नाव चुकीचे असणे, आधार कार्डला खाते लिंक नसणे अथवा पत्त्याचा घोळ असणे असे तांत्रिक कारणे आहेत, मात्र ते दुरुस्त करण्यासाठी प्रशासन यंत्रणेला निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महायुती मध्ये वारंवार जागा वाटपावरून राजकीय खटपट सुरू असल्याचे प्रश्न देसाई यांना विचारले असता ते म्हणाले आमची महायुती अत्यंत मजबूत आहेत आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे खासदार झाल्यामुळे महायुतीची शक्ती वाढली आहे, दोन खासदार सहा आमदार असे आमचे राजकीय बल झाले आहे आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे आमदार बाजी मारतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मल्हारपेठ येथील ग्रामीण रुग्णालयाचा अंतिम प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे, तसेच उरुल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचा आराखडा अंतिम झाला आहे याबाबत ठेकेदाराने वेळेत काम सुरू केले नाही तर त्याचे नाव काळा यादी टाकणार असल्याचा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका अनुदान कापत असल्याचा प्रश्न देसाई यांना विचारण्यात आला तेव्हा देसाई म्हणाले राष्ट्रीयकृत बँकांच्या समितीच्या बैठकीत त्यांना संपूर्ण अनुदान देण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे जर कोणी शाखा व्यवस्थापक अनुदान कापून घेत असेल तर अशांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेनेचे (उबाठा) एसटी स्थानकात आंदोलन
पुढील बातमी
अपघातातील जखमीचा मृत्यू

संबंधित बातम्या