मुंबई : नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आज १९ दिवस पूर्ण झाले आहेत. सोशल मीडियावरून समोर येणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोंवरुन त्यांची तब्येतीबाबत काळजी वाढली आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सर्वत्र क्षेत्रातून पाठिंबा वाढताना दिसत आहे. दुसरीकडे या संवेदनशील मुद्द्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट फेसबुक पोस्ट लिहीत केंद्र सरकार, यंत्रणा आणि देशातील एकूणच परिस्थितीवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली.
सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघाले आहे का?
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा आजचा १९ वा दिवस. त्यांच्या तब्येतीच्या ज्या बातम्या ऐकू येत आहेत किंवा जी दृश्य खासकरून सोशल मीडियावर दिसत आहेत ती निश्चितच काळजीत टाकणारी आहेत. हे म्हणायला प्रचंड वाईट वाटतंय की सरकारने सोनम वांगचुक यांचा आणि पर्यायाने या देशातील आंदोलनाची म्हणून एक जागा आहे तिचा बळीच घ्यायचा ठरवला आहे. हे सरकार जिथे श्रीरामाच्या तिजोरीला लुटलं जात असताना शांतपणे बघू शकते तिथे त्यांना नागरिकांच्या आंदोलनांने काय फरक पडणार ?
ज्या संस्थांनी निष्पक्ष वागायला हवं त्यांनाच स्वतःच्या ताब्यात घेतलं आहे. निवडणुका हव्या तशा मॅनेज करून घेतल्या जात आहेत. त्यासाठी अतिप्रचंड पैसा खर्च केला जात आहे. तो कुठून आला असा प्रश्न बहुसंख्य माध्यमं विचारत नाहीयेत. उलट हीच बहुसंख्य माध्यमं त्यांच्या अदृश्य बॉसच्या सांगण्यावरून सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील स्वकीयांची आणि विरोधकांना कसं बदनाम करता येईल यांत व्यस्त आहेत. आणि जी माध्यमं बोलत आहेत त्यांना आणि त्यांच्या मालकांच्या डोक्यावर एक टांगती तलवार फिरत आहे. त्यामुळे एका चांगल्या मुद्द्यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला चिरडणं, आंदोलनकर्त्याच्या शरीराचे हाल करणं हे सरकारला सहज सोपं आहे.
सोनम वांगचुक यांच्या मागण्या आणि भाजपची बदलती भूमिका
सोनम वांगचुक यांच्याबद्दल एकेकाळी भारतीय जनता पक्षाला आस्था होती. अर्थात भारतीय जनता पक्षाचं एक बरं असतं की त्यांच्या सोयीचा असेपर्यंत त्यांना तो माणूस प्रिय असतो. सोनम वांगचुक यांना २०१८ साली री-इन्व्हेस्ट कॉन्फरन्सला बोलावून त्यांच्याकडून अपारंपरिक ऊर्जा इत्यादींबद्दल ऐकून घेऊन त्यांचं कौतुक पण केलं होतं. अर्थात तेंव्हा आम्ही किती अपारंपरिक उर्जेला महत्व देतो हे दाखवायचं होतं म्हणून सोनम वांगचुक चालले. पुढे लडाख हा स्वतंत्र प्रदेश घोषित झाल्यावर वांगचुक यांना पण भाजपचं कौतुक वाटलं. पण पुढे वांगचुक यांच्या लक्षात आलं की यांचे हेतू अजिबात स्वच्छ नाहीत. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळायला हवा, लडाखमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ हवेत, तिथल्या लोकांच्या जमिनीवरचा हक्क राखला गेला पाहिजे या मागण्या वांगचुक यांनी केल्या, त्यासाठी उपोषण, आंदोलनं केली पण सरकारने काहीही केलं नाही. त्यांना आश्वस्त केलं आणि पुढे कृती काहीच नाही. कारण हेतू जे दाखवले जातात तसे कधीच नसतात.
आज वांगचुक यांची मागणी नीट परीक्षेचा झालेला गोंधळ आणि तो ज्या व्यक्तीमुळे झाला त्या मंत्र्याची हकालपट्टी करा आणि या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा हीच आहे. यात काहीच वावगं नाही. भाजपच्या सत्तेच्या काळात सर्वत्र परीक्षांमध्ये घोळ होत आलेत. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यापासून ते नीटच्या परीक्षांचे पेपर्स फुटणे ते अगदी आत्ता शिक्षकांच्या परीक्षांचे पेपर्स फुटण्यापर्यंत. हे सगळं यांच्या काळात का होतं आणि ते झाल्यावर हे इतके निर्ढावल्यासारखे का वागतात याचं उत्तर सोपं आहे. ते म्हणजे हाताशी सगळ्या यंत्रणांना धरून आलेली अमर्याद सत्ता.
निवडणुकांत अनेक उद्योग करून ओढून आणलेलं यश हे लोकांच्या मूकसंमतीचं द्योतक म्हणून दाखवायचं आणि आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज सध्या भाजपला आला आहे. आणि मी भाजप अशा अर्थाने म्हणतोय की त्यांच्या घटक पक्षांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीये, त्यांना दिल्लीतूनच चालवलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की जरा या प्रश्नात लक्ष घाला. NEET परीक्षांचा विषय आणि त्यातला गोंधळ हा काही सोपा विषय नाही. या परीक्षेतील घोळाने लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागली आहे. आणि हे आत्ताच घडलं आहे असं नाही याच्या आधी पण असे प्रकार घडले आहेत. आणि हा विषय राजकीय नाहीये. हा विषय सामाजिक आहे. NEET परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक हे ज्या त्रासातून गेले, जो मनस्ताप झाला त्याच्याशी संबंधित हा विषय आहे. आणि यात भारतीय जनता पक्षाचे समर्थक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनाच त्रास झालेला असणार. त्यामुळे आंदोलनाकडे राजकीय नजरेतून केंद्रातील सत्ताधारी पाहत आहेत, तेच मुळात त्यांच्या लघुदृष्टीचं लक्षण आहे.