वाई : बावधन येथील नेहा धनंजय पिसाळ यांनी आपल्या मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षक (STI) पदावर निवड होण्याचा मान मिळविला आहे. जाहीर झालेल्या निकालातून त्यांच्या संघर्षाला यशाची पावती मिळाली.
जानेवारी २०२६ मध्ये पूर्व परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या तयारीवर त्यांनी अधिक भर दिला. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि स्वतःवरील विश्वासाच्या जोरावर त्यांनी मुख्य परीक्षेची तयारी केली. अनेक महिने घेतलेल्या मेहनतीनंतर १४ ऑगस्ट २०२६ रोजी निकाल जाहीर झाला आणि राज्य कर निरीक्षक पदावर त्यांची निवड झाली. निकालाची बातमी कळताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ग्रामीण भागातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीने मिळविलेले हे यश परिसरासाठीही अभिमानाचा क्षण ठरले.
जिल्हा परिषद शाळेपासून स्पर्धा परीक्षेपर्यंतचा प्रवास
बावधनसारख्या ग्रामीण भागात सामान्य शेतकरी कुटुंबात नेहा यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बावधन येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर वाई येथील कन्या शाळेतून त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे किसन वीर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. प्राणीशास्त्र विषयात विशेष प्राविण्य मिळवत त्यांनी पदवी संपादन केली. घरातील वातावरणाने मात्र त्यांच्या मनात स्पर्धा परीक्षेची बीजे आधीच रुजवली होती. त्यांचे चुलते संग्राम पिसाळ हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा नेहा यांच्या मनातही दृढ होत गेली.
कुटुंबाचा भक्कम पाठिंबा
नेहा यांचे वडील धनंजय पिसाळ शेती करतात, तर आई गृहिणी आहे. त्यांचा छोटा भाऊ शिक्षण घेत आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण असली, तरी मुलीने मोठे यश मिळवावे, यासाठी आई-वडिलांनी कायम प्रोत्साहन दिले. आजोबा विलास बापू पिसाळ हे नेहांच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष ठेवत. त्यांच्या अभ्यासाचा आढावा घेत आत्मविश्वास वाढविण्याचे काम त्यांनी केले. कुटुंबीयांचा हा विश्वास आणि पाठिंबा नेहांच्या यशाच्या प्रवासातील मोठी ताकद ठरला.
‘काहीही झाले तरी MPSC परीक्षेत यश मिळवायचे,’ ही जिद्द मनाशी बाळगून नेहा यांनी तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला काही दिवस त्यांनी घरीच अभ्यास केला. त्यानंतर सातारा येथील कृषिगंगा स्पर्धा परीक्षा केंद्रात पूर्णवेळ तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अभ्यासाइतकीच मानसिक ताकदीचीही परीक्षा असते. परीक्षांच्या सतत बदलणाऱ्या तारखा, रखडणारे निकाल आणि भवितव्याबाबतची अनिश्चितता यामुळे अनेकदा मानसिक ताण वाढत होता. मात्र नेहा यांनी या अडचणींना खचून न जाता प्रत्येक वेळी नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली.
आपल्या यशाचे श्रेय नेहा यांनी केवळ स्वतःच्या मेहनतीला न देता आई-वडील, कुटुंबीय, गुरुजन आणि मित्र-मैत्रिणींना दिले आहे. “हे यश माझे एकटीचे नसून माझे आई-वडील, सर्व कुटुंबीय, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेले गुरु आणि साथ देणारे मित्र-मैत्रिणी यांचे आहे. त्यांच्या पाठिंब्याच्या शिदोरीच्या बळावर यापुढेही आणखी चांगले प्रयत्न करत राहणार आहे,” असे नेहा पिसाळ यांनी सांगितले.