सातारा : संविधानात दिलेल्या अधिकाराचा वापर करताना कर्तव्य व जबाबदारी पालन केले पाहिजे. जगातील अनेक राष्ट्रे कधी एकच भाषा असलेली,तर कधी एकच धर्म असलेली,अशी होती.पण ती देखील तुटली गेली. सोव्हियत संघ राष्ट्रांचे काय झाले आपणास माहीत आहे. आपली प्रजासत्ताक लोकशाही ही एकसंघ आहे. ही सार्वभौम आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय लोकशाही संधी मिळवून देते. लोकशाहीला ७६ वर्षे पूर्ण होत असताना जाणवते कि जगातील विविध देशाचा विचार करता आपली परिस्थिती बरी असून आपले प्रजासत्ताक सुदृढ आहे. आपली डोकी अजून ठिकाणावर आहेत. आपल्या विचारात सकसपणा आहे. राष्ट्राची एकता ,अखंडता आणि एकात्मता टिकवून ठेवणारा भारतीय संविधानाचा विचार भारतीय जनतेचे हित करत आहे. ही बरी परिस्थिती हातातून कधीही निसटून द्यायची नाही. म्हणूनच लोकशाही पद्धती जागृत ठेवायची असेल तर समाजमन सतत जागरूक ठेवावे, असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
ते विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांनी प्रजासत्ताक दिनी, संयुक्त रित्या आयोजित केलेल्या भारतीय लोकशाही अमृत महोत्सव व वंदे मातरम गीत उत्सव राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते. समारंभास इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत ,विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय कुंभार ,भाषा मंडळाचे संचालक व उपप्राचार्य प्रा.डॉ.सुभाष वाघमारे आंतरविद्या शाखा अधिष्ठाता डॉ.आर.आर .साळुंखे,उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख, स्पर्धा समन्वयक डॉ.संजयकुमार सरगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा आणि शिक्षण संदर्भाने बोलत असताना ते पुढे म्हणाले की ‘आपल्या शिक्षणात ज्ञान संकलित करणे, आत्मसात करणे यावर भर अधिक आहे. पण ज्ञान सर्वांना मिळावे ही काळजी घेण्याबरोबर मन देखील चांगले ठेवावे लागणार आहे. मन खूप चंचल आहे,ते चांगले वाईट घडवत असते. माणसाचे जगणे सुसह्य होण्यासाठी मनाची निगराणी होईल अशी काळजी घ्यायची आहे. स्पर्धा माणसाला उन्नत काम करायच्या प्रेरणा देतात. सर्व बाजूंचा विचार करायची संधी देतात, म्हणून स्पर्धा या केवळ विजेते होण्यासाठी नसतात ,तर अधिक जबाबदारी घेण्याच्यासाठी आवाहन करत असतात. म्हणून स्पर्धा देखील निरोगी असायला हव्यात. आपल्या विद्यापीठाने जाणीवेने या स्पर्धा सद्हेतूने घेतल्या. केवळ विद्यार्थीच नाही तर भारतीय नागरिक सहभागी होतील या साठी त्या खुल्या केल्या ,यामुळे विद्यापीठे ही समाजात राहणारी ,समाजाला विचार करायला लावणारी ,आणि समाजाला नवे हिताचे काही देणारी असायला हवीत हे कार्य घडत राहते . खरे म्हणजे या पुढच्या काळात शिक्षण क्षेत्रात सामाजिक शास्त्रांची चालती राहणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाने शिक्षणातील तोच तो पणा, चातुर्वर्ण्य संपवले आहे. आता शिकणाऱ्याच्या इच्छेनुसार विविध शाखेत शिक्षण घेता येते. हुकुमशाहीपेक्षा लोकशाही महत्वाची असते. लोकांना प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार मिळतो. देशाला केवळ भक्तीची गरज नाही. उघड्या डोळ्याने राष्ट्राकडे पाहणारी व विचार करणारी सजग पिढी निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणूनच अशा स्पर्धा विचारी, चिंतनशील व समाजहितकारक असतात असेही ते म्हणाले.
भारतीय लोकशाही अमृत महोत्सव व वंदे मातरम गीत उत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत समन्वयक प्रा. डॉ. संजयकुमार सरगडे यांनी केले. भाषा मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. सुभाष वाघमारे यांनी स्पर्धेचा हेतू सांगून या प्रकारच्या स्पर्धा जाणीवेने विद्यापीठात आयोजित केल्याचे सांगत विद्यालयीन,महाविद्यालयीन व खुल्या गटात अशी मिळून ३६६ स्पर्धक सहभागी झाल्याचे सांगितले.
या स्पर्धेतील खुल्या गटांतील विजेते प्रकाश भोंगाळे, प्रभाकर बनसोडे ,पूनम माने,महाविद्यालयीन गटात विजेते अनुराधा गायकवाड,अंजली चांदवडकर, साहिल आगरे व विद्यालयीन गटात कल्याणी घाटगे,राजनंदिनी माने,व श्रेया सुडके या ९ पारितोषिक विजेत्यांचा कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, इंद्रजीत सावंत, प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, डॉ. विजय कुंभार यांचे हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
परीक्षक प्रा. विश्वजित जाधव, प्रा.डॉ. महादेव चिंदे, विशाल कांबळे, डॉ. शुभांगी कुंभार, सौ.रजनी देसाई, प्रा. श्रीकांत भोकरे, यांचाही सत्कार करण्यात आला. समन्वयक डॉ.संजयकुमार सरगडे, सहकार्य करणारे ग्रंथालय परिचर महेंद्र अष्टेकर, व सी.एस.आर फंडातून मदत केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्र ,यांचा सन्मान करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय शिक्षक कॉंग्रेस समितीद्वारा, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ.विद्या नावडकर यांना ‘नारी शक्तीचा सन्मान-२०२६ हा पुरस्कार’देण्यात आल्याबद्दल कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार डॉ.आबासाहेब उमाप यांनी मानले.सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा.डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा.प्रियांका कुंभार व प्रा. श्रीकांत भोकरे,प्रथमेश बाबर,प्रथमेश ह्बळे यांनी परिश्रम घेतले.