सातारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहरातील गणेश मंडळांना दिलेल्या भेटींना यंदा केवळ धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांची जोड राहिलेली नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा थेट जनसंपर्क राजकीयदृष्ट्याही लक्षवेधी ठरत आहे. शाहूपुरी, गडकरआळी तसेच शहरातील विविध भागांत दुचाकीवरून फिरत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी साधलेला संवाद हा त्यांच्या संघटनात्मक संपर्काचा भाग म्हणून पाहिला जात आहे.
मंत्रिपदाची जबाबदारी असतानाही वाहनांचा मोठा ताफा किंवा औपचारिकतेचा बडेजाव न करता शिवेंद्रसिंहराजे थेट गणेश मंडळांच्या मंडपात पोहोचले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्थानिक पातळीवरील प्रश्नांची माहिती घेत त्यांनी परिसरातील राजकीय-सामाजिक नाडीशी आपला संपर्क कायम असल्याचे दाखवून दिले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना महत्त्व प्राप्त होणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विविध गटांची ताकद, स्थानिक नेतृत्वाची सक्रियता आणि मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणी यावर भर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजेंच्या गणेश मंडळ भेटींकडे केवळ उत्सवी कार्यक्रम म्हणून न पाहता कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविण्याच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
शाहूपुरी आणि गडकरआळीतील भेटींमध्ये कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. स्थानिक पातळीवरील अडचणी, विकासकामे आणि आगामी राजकीय घडामोडींबाबतही चर्चा झाल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरासह संबंधित भागातील संघटनात्मक संपर्कावर त्यांचे लक्ष असल्याचे दिसून आले.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील राजकारणात शिवेंद्रसिंहराजे हे महत्त्वाचे नेतृत्व मानले जाते. राज्यातील मंत्रिपदाची जबाबदारी आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय प्रभाव यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या भूमिकेकडे पक्षातील तसेच विरोधकांचेही लक्ष राहणार आहे. विशेषतः मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवण्याची त्यांची शैली आगामी निवडणुकीच्या तयारीत कितपत उपयोगी ठरते, हे निवडणूक कार्यक्रमानंतर स्पष्ट होईल.
‘ग्राउंड कनेक्ट’ मजबूत करण्याचा राजकीय संकेत
गणेशोत्सव हा जनसंपर्काचा मोठा मंच ठरत असताना शिवेंद्रसिंहराजेंनी त्याचा वापर कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी केला. त्यामुळे दुचाकीवरील हा दौरा साधेपणाचे दर्शन घडविण्यापुरता मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ग्राउंड कनेक्ट’ मजबूत करण्याचा राजकीय संकेत म्हणून चर्चेत आला आहे.
गणेश मंडळांतून शिवेंद्रसिंहराजेंचा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क' शहरातील विविध भागांत दुचाकीवरून फिरत कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांशी संवाद
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा