खंडाळा : पारगाव-खंडाळा येथे तीन मालट्रकांमधून १०५ टन अमोनियम नायट्रेट या स्फोटक पदार्थाची सुरक्षिततेच्या मानकाचे उल्लंघन करीत वाहतूक केली जात होती. याप्रकरणी तीन मालट्रक चालकांसह पनवेल, तळोजा येथील फर्टिलायझर कंपनीच्या वाहतूक अधिकाऱ्यांविरुद्ध खंडाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल, तळोजा येथील दीपक फर्टिलायझर येथून तेलंगणा राज्यातील हैदराबादमार्गे नलगोंडाजवळील चित्याल याठिकाणी मालट्रक (टिएस ०२ युडी ३१७०, टिएस ०२ युडी ३१७७, टिएस ०२ युडी ३१७२) मधून तब्बल १०५ टन अमोनियम नायट्रेट या स्फोटक पदार्थाची सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करीत पारगाव-खंडाळा येथील एसटी बसस्थानकाजवळ उभे असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले.
संबंधितांनी याबाबतची पोलिस ठाण्याला माहिती दिली. यावेळी संबंधित मालट्रक चालक रुपेशकुमार परमेश्वर तांती (वय ४६, रा. सरकपूर, ता. बलदोर जि. खागरिया बिहार), अजकुमार अशोक प्रसाद (वय ३६, रा. गोपालवाडा जि. मध्यपुरा, बिहार), फुलचंद झालु पासवान (४६, रा. महेशकुट, ता. गोगरी, जि. खगडिया बिहार) व दीपक फर्टिलायझर कंपनीचे वाहतूक अधिकारी यांनी अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ असल्याचे माहिती असतानाही वाहतूक परवाना नियमांचे व सुरक्षिततेच्या नियमांचे भंग केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच मालट्रक जप्त केले आहेत. पोलिस अंमलदार सुरज पवार यांनी फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक शितल माने तपास करीत आहेत.
स्फोटक पदार्थाची सुरक्षिततेच्या मानकाचे उल्लंघन करत वाहतूक; पारगाव-खंडाळा येथे तीन मालट्रकांवर कारवाई
by Team Satara Today | published on : 29 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा