म्हसवडमध्ये भरारी पथकाची दुकानावर कारवाई

by Team Satara Today | published on : 19 July 2025


सातारा : खत गोणीची जादा दराने तसेच विद्राव्य खताची लिंकिंगद्वारे विक्री होत असल्याच्या तक्रारीवरुन कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय पथकाने म्हसवडमध्ये छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा नोंद केला आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, दि. १५ जुलै रोजी जिल्हास्तरीय भरारी पथकाकडे राज्य तक्रार निवारण कक्षातील व्हाटसअप मोबाईल क्रमांकावर माण तालुक्यातील म्हसवड येथील मे. बाप्पा कृषी सेवा केंद्राविरोधात युरिया खत गोणीची ३०० रुपये दराने आणि त्यासोबत १९:१९:१९ या विद्राव्य खताची लिंकींगद्वारे विक्री केली जात असल्याचे तक्रार प्राप्त झाली होती. 

त्यानुसार शुक्रवारी सकाळी जिल्हास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय फडतरे आदींसह इतर अधिकारी मे. बाप्पा कृषी सेवा केंद्रात चौकशी व तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी दुकानामध्ये मालक मंगेश अशोक सावंत (रा. म्हसवड), कामगार रोहन खांडेकर हे आणि खरेदीसाठी आलेले शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी अधिकाऱ्यांसमोर युरिया खताची ३०० रुपये प्रती गोणी प्रमाणे विक्री आणि त्यासोबत इतर खत निविष्ठांचे लिंकींग होत असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्याने मागणी करुनही खरेदी बिले दिली जात नसल्याचे आढळले. 

त्यानंतर दुकानाची तपासणी केली असता दुकानदाराकडे विक्री परवाना होता. मात्र, खतांची खरेदी व विक्री बिलांची मागणी केली असता ती उपलब्ध नसल्याचे दुकानदाराने सांगितले. खत विक्री व साठा नोंद वहीचीही तपासणीसाठी मागणी केल्यावर तीही दुकानात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या नियमानुसार अनुदानित खतांची विक्री ई-पाॅश मशिनद्वारे करत नसल्याचेही दिसून आले. ई-पाॅश मशिनवरील अनुदानित रासायनिक खतांचा साठा आणि म्हसवड मार्केट यार्ड येथील गोदामात प्रत्यक्ष तपासणी केल्यावरही तफावत आढळून आली.

त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी म्हसवड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

कृषी दुकानदारांनी जादा दराने खतांची तसेच लिकिंगद्वारेही इतर निविष्ठांचीही विक्री करु नये. शेतकऱ्यांनीही जादा दराने खत विक्री होत असल्यास कृषी विभागाच्या पथकांकडे तक्रार करावी. तसेच कृषी निविष्ठा धारकांनीही कंपन्यांनी लिंकिंगद्वारे खते दिलीतरी तक्रार द्यावी. कृषी विभागाकडून याची दखल घेतली जाईल. - गजानन ननावरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍याला चार वर्षे सक्तमजुरी
पुढील बातमी
वाईतील मध्यवस्तीत भरदिवसा घरफोडी

संबंधित बातम्या