पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव देशभर प्रसिद्ध आहे. पुण्यातील गणपती उत्सव पाहण्यासाठी देशातून अन् विदेशातून भाविक येतात. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मोठे आकर्षण असते. अनेक वेळा विसर्जन मिरवणूक लांबते. यामुळे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत होण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंडळ मागील वर्षाप्रमाणे यंदाही दुपारी 4 वाजताच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टचा हा निर्णय यापुढे कायम रहाणार आहे, असे मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती :
दगडूशेठ मंडळाच्या या निर्णयामुळे यंदाही पुण्यातील विसर्जन मिरवणूका लवकर संपणार आहेत. यावर्षी मंडळातर्फे हिमालयातील जटोली शिवमंदिरची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. त्या मंदिरात कर्नाटकातील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते गणेश चतुर्थीला सकाळी 11:11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
गणेश भक्तांसाठी 50 कोटींचा विमा ;
दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे ऋषिपंचमीनिमित्त बाप्पा समोर 31 हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. गणेशोत्सव काळात गणेश भक्तांसाठी 50 कोटींचा विमा मंडळातर्फे उतरवण्यात येणार आहे. मांडव परिसरात 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मांडवापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या गणेश भक्तांसाठी विविध ठिकाणी चार मोठ्या एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत.
सोशल मीडियावर 24 तास दर्शनाची सोय :
दगडूशेठ गणपती मंडळाचा देखावा 24 तास सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून निघणार आहे. आगमनासाठी सिंह रथ तयार करण्यात येत आहे.
पुण्यात १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरु केली. त्याच्या दोनच वर्षांत १८९६ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करुन उत्सव सुरु केला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. २०१७ मध्ये या मंदिराने १२५ वर्षे साजरी केले होते.