सातारा : गडकर आळीतील ग्रामदैवत श्री. पेढ्याचा भैरोबा देवस्थान परिसरात करण्यात आलेल्या विकासकामावरून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. परिसराचे नैसर्गिक स्वरूप आणि धार्मिक पावित्र्य अबाधित ठेवण्याऐवजी काँक्रीटीकरण करण्यात आल्याने या कामाची आवश्यकता आणि दर्जा याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणाची तृतीय पक्षामार्फत चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
देवस्थान परिसरातील पूर्वीच्या नैसर्गिक मुरमाच्या वाटा नागरिकांसाठी सोयीच्या असताना त्यावर काँक्रीटचा थर देण्याची गरज काय होती, असा सवाल ग्रामस्थांनी केला. वॉकिंग ट्रॅक उभारण्यापूर्वी तांत्रिक तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला होता का, कामाचा आराखडा काय होता आणि त्याची गुणवत्ता तपासली कोणी, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, पिढ्यान्पिढ्या या परिसराशी जोडलेल्या स्थानिक रहिवाशांना कामापूर्वी विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विकासकामानंतर परिसरात रात्रीच्या वेळी अनधिकृत व संशयास्पद हालचाली वाढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, देवस्थान परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या कामाची स्वतंत्र चौकशी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, तसेच आवश्यक असल्यास परिसरातील कामाची पुनर्तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन व उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला.
शिवसेना शहरप्रमुख प्रणव वासुदेव सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दत्तात्रय साळुंखे, सुभाष साळुंखे, ओंकार महांगडे, शिवेंद्र ताटे, बाबासाहेब सावंत, शरद कदम, विश्वास साळुंखे, उमेश साळुंखे, संतोष जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भैरोबा परिसरातील विकासकाम वादात; काँक्रीटीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा आरोप, स्वतंत्र चौकशीची मागणी
विकासकामानंतर परिसरात रात्रीच्या वेळी अनधिकृत व संशयास्पद हालचाली वाढल्याचा दावा
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा