फुटक्या तलावाचे होणार सुशोभीकरण

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पुढाकार

by Team Satara Today | published on : 28 March 2025


सातारा : शहरातील फुटक्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या तलावाचे सुशोभीकरण करावे, अशी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पालिकेच्या येत्या शुक्रवारी होणाऱ्या प्रशासकीय सभेत तलावाच्या सुशोभीकरणाचा विषय विषयपत्रिकेवर घेतला आहे. यामुळे आगामी काळात फुटक्या तलाव परिसराचा कायापालट होणार आहे.

शहराच्या विकासाबरोबरच साताऱ्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, त्यांची माहिती सर्वदूर पोचावी, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा कायम आग्रह असतो. शहरातील प्रमुख असलेल्या फुटक्या तलावाच्या सुशोभीकरणाची इच्छा पालिकेकडे पत्राद्वारे मांडली. पालिकेनेही त्यानुसार कार्यवाही करत तलावाच्या सुशोभीकरणाचा विषय विषयपत्रिकेवर घेतला आहे.

शहरात मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव आदी प्रमुख तळी आहेत. फुटका तलाव हे त्यापैकीच एक ऐतिहासिक तळे आहे. या तलावात गणपतीचे मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे या ठिकाणी सतत नागरिकांची गर्दी असते. या तलावात पाण्याचे झरे असल्यामुळे तलावातील पाणी कायम स्वच्छ असते. दगडी बांधकाम असलेल्या या तलावात स्थानिक नागरिक आवर्जून पोहण्यासाठी येतात. शहरातील व आसपासच्या गावातील नागरिकांसाठी फुटका तलाव हे पर्यटनस्थळच ठरले आहे. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण व्हावे, अशी इच्छा शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली आहे.

या तलावाच्या परिसरात सजावट, संगीत कारंजे, प्रेक्षा गॅलरी व इतर विविध प्रकारचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या तलावाच्या अवतीभवती सजावट, संगीत कारंजे, तसेच प्रेक्षक गॅलरी उभारण्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व शौचालय बांधणे आदी कामांची आवश्‍यकता आहे, असा अहवाल बांधकाम विभागाने नुकताच सादर केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रातील मुलीची बंगळुरूत हत्या
पुढील बातमी
तृणधान्य महोत्सावात ग्राहकांनी केली 22 लाखांची खरेदी

संबंधित बातम्या