बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने जनसामान्यांच्या मनात घर करणारे अजित पवार यांचे आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी (दि. २८) खासगी विमानाच्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे केवळ बारामतीच नव्हे, तर सातार्यासह संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळला.
आज दुपारी १२ : १५ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या लाखो जनसागराने साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. 'दादा' आपल्यात नाहीत, या गोष्टीवर आजही कोणाचा विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात अपार दुःखाचे काहूर माजले होते.
विद्या प्रतिष्ठानचा परिसर आज "अजित दादा अमर रहे", "जब तक सुरज चांद रहेगा, दादा तेरा नाम रहेगा" अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज मंत्री व राजकीय नेते उपस्थित होते. सर्वांनी अजितदादांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
अतिशय भावूक वातावरणात आणि विधिवत मंत्रोच्चारांच्या गजरात अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ आणि कनिष्ठ पुत्र जय यांनी आपल्या वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिला. हा क्षण पवार कुटुंबासाठी आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायी होता. राजकारणातील एक 'कामाचा माणूस' आज काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना यावेळी व्यक्त होत होती.
बारामतीच्या मातीशी नाळ जोडलेला आणि राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला हा नेता अशाप्रकारे अचानक सोडून जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.