सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नितीन पाटील हे मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रथमच आले. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
लोकसभा निवडणुकी वेळी नितीन पाटील साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक होते. महायुती मध्ये मतदारसंघ विभागणीत भाजपच्या वाट्याला गेल्याने नितीन पाटील व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्ते नाराज झाले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईतील महायुतीच्या प्रचारसभेत नितीन पाटील यांना राज्यसभेत खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पवार यांनी शब्द पाळला. नितीन पाटील यांची बिनविरोध खासदार म्हणूनही निवड झाली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात आणखी ताकद वाढणार आहे. नितीन पाटील यांच्या निवडीने वाई- खंडाळा महाबळेश्वर तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा केला जात आहे.
खासदारकीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले. नितीन पाटील यांच्या निवडीने सातारा जिल्हा अजित पवार गटात उत्साहाचे वातावरण आहे. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा केला जात आहे.
राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नितीन पाटील हे मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रथमच आले आहेत. यामुळे जिल्ह्यात प्रवेश करते वेळी पुणे बंगळूर महामार्गावर शिंदेवाडी (ता खंडाळा) येथून शिरवळ खंडाळा वेळे (ता वाई) सुरूर, कवठे, भुईंज, पाचवड, उडतारे, लिंब फाटा, सातारा शहरात वाढे फाटा,बॉम्बे रेस्टॉरंट चौक आदी ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
वेळे- सुरूर येथील कार्यकर्त्यांचे स्वागत झाले. कवठे येथे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा, तुतारी, फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी कवठे येथे किसन वीर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांचे गाव असणाऱ्या बोपेगाव (ता. वाई) फाट्यावर गावकऱ्यांनी मोठे स्वागत केले. साताऱ्यातील बाँबे रेस्टॉरंट चोंकात सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पेढेतुला करून त्यांचे स्वागत केले. सायंकाळी कराड येथे प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नितीन पाटील अभिवादन करणार आहेत. सातारा शहरातील विकास नगर येथे त्यांच्या निवासस्थानी स्वागताला जिल्हाभरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे मोठे बंधू मिलिंद पाटील व कुटुंबीयांनी सर्व कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले. किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, अनेक संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे पालिकांचे माजी सदस्य मोठ्या संख्येने त्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.
बिनविरोध निवडी नंतर राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांचे सातारा जिल्ह्यात मोठे स्वागत
by Team Satara Today | published on : 27 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा