नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर

by Team Satara Today | published on : 29 March 2025


नाशिक : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यानंतर आगामी सिंहस्थ कुंभमेळाची तयारी जोरदारपणे सुरू असून महायुती सरकारने याबाबत जबाबदारी निश्चित करायला सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये  यंदाचा सिंहस्थ कंभुमेळा होत असून तत्पूर्वीच नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी समोरा आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा 'अ' दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे, येथील देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार असून भाविकांना  देखील मोठ्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. यावेळी, येथील तिर्थक्षेत्राची पाहणी करुन त्यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या होत्या. आता, त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे, भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर येथे वर्षाला कोट्यवधी भाविक येत असतात. म्हणूनच पंढरपूरप्रमाणे नाशिक आणि त्र्यंबकला देखील शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत अ वर्ग दर्जा मिळाल्यास भाविकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देता येतील, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर कुंभमेळ्यापूर्वी शासनाने हा निर्णय घेतला आहे. 

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र 'अ' दर्जा देण्यास नगर विकास खात्याने मंजुरी दिली आहे.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान, निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ, महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आशा वेगवेगळ्या कारणाने वर्षभर येथे भाविकांची वर्दळ असते. त्यामुळे, तिर्थक्षेत्र अ दर्जा देण्याची मागणीही सातत्याने केली जात होती. विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा भाविकांना व मंदिर प्रशासनाला फायदा होणार आहे. 

दरम्यान, याअगोदर 3 वर्षांपूर्वी ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 6 तिर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये, येवला तालुक्यातील कोटमगावचे जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील श्री खंडेराव महाराज मंदिर आणि सुकेणे येथील श्री दत्त मंदिर व पिंपळगाव बसवंत येथील श्री राम मंदिर या देवस्थानचा ब वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यात आला होता. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात हिंसाचार
पुढील बातमी
आयपीएस डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन

संबंधित बातम्या