लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये सर्वसामान्यांच्या खिशातील

उबाठा शिवसेना गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांची टीका

by Team Satara Today | published on : 27 September 2024


सातारा : महायुती शासनाने लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये मंजूर केले आहेत. यासाठी दिला गेलेला निधी हा सर्वसामान्यांनी दिलेल्या करातून आहे. ती पैशाची उधळपट्टी आहे. ही योजना राजकीय हेतूने कार्यरत असून या योजनेचे श्रेय कोणाचे, याविषयी महायुतीमध्ये संभ्रमावस्था आहे, अशी घणाघाती टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
 सातार्‍यात स्त्री संवाद शक्ती यात्रेच्या निमित्ताने त्या सातार्‍यात आल्या होत्या. महिला मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेच्या संपर्क संघटक रोशनी गायकवाड, समन्वयक संजना मुणगेकर, सातारा जिल्हा महिला संघटिका सुनंदा महामुलकर, समन्वयक छाया शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
ज्योती ठाकरे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये स्त्री संरक्षणाचा प्रश्न अत्यंत कळीचा बनला आहे. महाराष्ट्रामध्ये स्त्री सुरक्षित नाही अशा अवस्था आहे. स्त्री सुरक्षेवर कायदे होतात. मात्र राज्यात कायद्याचा धाक ठेवून अपप्रवृत्ती शासित करायला महायुती सरकार अपयशी ठरले आहे. महिला अत्याचारावर महायुती सरकार सरकारची वक्तव्य म्हणजे जुमलेबाजी वाटते, अशी टीका त्यांनी केली. बदलापूर प्रकरणामध्ये गुन्हेगाराला शासन झाले. मात्र ते लोकशाही संकेताला धरून झालेले नाही. संबंधित आरोपीचा एन्काऊंटर झाला, त्याला शासन झाले. या घटनेतून जनक्षोभ व्यक्त झाला आहे. या घटनेला समर्थन मिळत असले तरी भारताने स्वीकारलेल्या लोकशाहीच्या संकेताप्रमाणे ती शिक्षा झालेली नाही. सातार्‍यात ज्योती ठाकरे यांनी सातारा जिल्ह्यातील 200 महिलांशी स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांना आगामी शाखा विस्तार, सदस्य नोंदणी आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना केल्या. 
पत्रकारांशी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सध्याचे महायुतीचे सरकार एक फुल दोन हाफ आहे. लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे सर्वसामान्यांच्या खिशातील आहेतण या योजनेच्या श्रेयवादाविषयी महायुतीमध्ये संभ्रम आहे. गेल्या अडीच वर्षात महिलांवर प्रचंड अत्याचार होत आहेत. महिला अत्याचारांवर बोलायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वेळ नाही. या योजना राजकीय हेतूने प्रेरित आहेत, अशी टीका त्यांनी केली. सातार्‍यातील एका पाणी योजनेला शिवसेनाप्रमुख यांचे नाव देण्यासंदर्भात राजकीय विरोध झाला, या प्रश्नावर बोलताना ज्योती ठाकरे म्हणाल्या. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहे. त्यांच्या नावाला जर सातार्‍यात विरोध होत असेल तर विरोध करणार्‍यांचे हिंदुत्व दंभ आहे. याविषयी न बोललेले उत्तम. महायुती सरकार मधील काहींना उच्चभ्रू लोकांशी आपली तुलना करून घेणे मानसिकता झाली आहे. ही मानसिकता अत्यंत खोटी असून त्याचे प्रत्यक्ष परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येतील असे त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, पितृपंधरवड्यानंतर जागा वाटपाच्या संदर्भात महा विकास आघाडीचे नेते चर्चा करतील. यामध्ये मेरिट च्या उमेदवारांना निश्चित संधी मिळेल. या वाटपामध्ये शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काश्मीर मुद्यावर पाकिस्तानला मोठा झटका
पुढील बातमी
माझी वसुंधरा अभियानात सातारा पालिका अव्वल

संबंधित बातम्या