मुंबई : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल, तसेच पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनातर्फे "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पुर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लाभार्थींनी गोंधळून न जाता तसेच कोणीही आर्थिक मागणी करीत असेल त्यास बळी पडू नये असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.