पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. पुणेकरांनी दिलेले प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगालॉज मित्र मंडळाच्या वतीने लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार समारंभात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे हा सोहळा पार पडला. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी अन्य मान्यवरांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सुनिता झाडे (नागपूर) यांना ‘शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या’ या कविता संग्रहासाठी कै. शिवाजीराव अमृतराव ढेरे स्मृतिप्रीत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’ देण्यात आला. तसेच, फेलिक्स डिसोजा (वसई) यांना ‘आरशात ऐकू येणार प्रेम’ आणि सफर अली इसफ (वैभववाडी) यांना ‘अल्लाद ईश्वर’ या कविता संग्रहांसाठी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना अशोक सराफ म्हणाले, “या पुरस्काराने माझा सन्मान झाला आहे. स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचा मी ऋणी आहे. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले आहे.”
डॉ. मोहन आगाशे यांनी अशोक सराफ यांचे कौतुक करताना सांगितले की, “ते तळागाळात मिसळणारे कलाकार आहेत. त्यांच्यात बडेजावपणा नाही. अशा साध्या-सोबत्या माणसाला पुरस्कार मिळणे आनंदाची बाब आहे.”
नागराज मंजुळे म्हणाले, “अशोक सराफ यांच्या सरळ स्वभावामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. ते फक्त चित्रपटसृष्टीतील नाहीत, तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहेत.”
कार्यक्रमात ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ढेरे व जाधव परिवाराने गेल्या ३९ वर्षांत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन करण्याचे कार्य केले आहे, असे सांगितले.
कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या कवींनी कविता सादर केली. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ, रामदास फुटाणे, फ. मु. शिंदे, अशोक नायगावकर यांनी राजकीय, सामाजिक आणि भावनात्मक विषयांवर कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच, महिलांच्या समस्या आणि स्वाभिमान यावर कवयित्रींनी प्रभावी कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.