सातारा : गोडोली, अजंठा चौक सातारा येथे साईनाथ वडापाव सेंटरच्या मालकाला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा, अन्यथा दुकान चालू देणार नाही, तसेच "एकेकाला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत तिघांनी दहशत माजवली. दरम्यान, दुकानातील खुर्च्या, टेबल, भांडी फोडून नुकसान करण्यात आले. याबाबतच्या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या वडापाव सेंटरच्या गल्ल्यातील ४५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन दुकान मालक व कामगाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यात आली आणि आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी सौ. सरिता जगदीश जाधव (रा. निशिगंधा कॉलनी, देगाव फाटा) यांनी इंदिरानगर झोपडपट्टी येथील रसिक धोत्रे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात खंडणी, शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करत आहेत.