सातारा : मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने माण तालुक्यात सात गावे व ७३ वाड्यांना प्रशासनाकडून नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही माण तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
दरवर्षी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांच्या काही भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल जाणवू लागल्याने प्रशासनाने टंचाईसदृश गावांमध्ये उपाययोजना सुरू केल्या आहेत. यावर्षी माण तालुक्यातील बिजवडी, मोही, धुळदेव, वरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, जाशी या गावांमध्ये व लगतच्या ७३ वाड्यांमध्ये टंचाई जाणवू लागल्याने नऊ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
या पाण्यावर ११ हजार ६४६ लोकसंख्या व नऊ हजार ९५२ पशुधन अवलंबून आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, माण तालुक्याप्रमाणे कोरेगाव, फलटण, खटाव तालुक्यांतही काही गावांमध्ये टंचाईची दाहकता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर टॅंकर मागणीचे प्रस्ताव करण्याची प्रक्रिया अनेक गावांमधून सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.