कोयना धरणातील पाणीसाठा 100.92 टीएमसीवर; पूर्ण क्षमतेसाठी आणखी 4.33 टीएमसी पाण्याची गरज,धरण व्यवस्थापनाची माहिती

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : कोयना सध्या धरणात १००.९२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ४.३३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग केला जात नसला, तरी पावसाचा जोर वाढल्यास कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

वीजनिर्मिती, सिंचन तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कोयना धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अपवाद वगळता दरवर्षी १५ ऑगस्टच्या आसपास धरण पूर्ण क्षमतेने भरते. मात्र, यंदा मध्यंतरी पावसाने काही काळ उघडीप दिल्याने धरणातील पाणीपातळी वाढण्याचा वेग मंदावला. त्यामुळे यंदा २४ ऑगस्ट रोजी सकाळी धरणातील पाणीसाठा १०० टीएमसीवर पोहोचला.

कोयना धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. सध्या धरणात १००.९२ टीएमसी पाणीसाठा असल्याने पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ४.३३ टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बुधवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर येथे १० मिलिमीटर, तर नवजा येथे १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर परिसरात मात्र पावसाने काहीशी उघडीप दिल्याचे धरण व्यवस्थापनाच्या पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील आवक यावर पाणीपातळी अवलंबून असून, सध्या ती हळूहळू वाढत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची शक्यता असल्याचे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
BA, BSc, B.Com पदव्या नोकरी देण्यास सक्षम नाहीत?; नीती आयोगाच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, शिक्षण प्रणालीला अधिक नोकरी-केंद्रित बनवण्याची शिफारस
पुढील बातमी
जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम पाहिजे; छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ओबीसींचा मोर्चा, राज्यस्तरीय ओबीसी संघटनांची बैठकीत निर्णय

संबंधित बातम्या