पाठदुखी कडे मुळीच दुर्लक्ष नको

वेळीच सावध व्हा नाहीतर...

पाठदुखी ही अनेकांसाठी अगदी सामान्य समस्या असते. सतत बैठे काम केल्याने किंवा महिलांच्या बाबतीत जास्त काळ ओट्यापुढे उभे राहिल्याने पाठदुखीची तक्रार उद्भवते असा आपला समज असतो. मग आराम केल्यावर किंवा थोडा व्यायाम केल्यावर हे पाठीचे दुखणे कमी होईल म्हणून आपण ते अंगावर काढतो. कधीतरी आपण पाठीला मसाज घेतो तर कधी एखादे तेल लावून हे दुखणे कमी होते का याची वाट पाहतो. पण केवळ बैठ्या कामाने किंवा गाडी चालवल्यानेच पाठ दुखते असे नाही. तर पाठदुखी मागे आहारातून पुरेसे पोषण न मिळणे आणि शरीरात विविध जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होणे ही मुख्य कारणे असू शकतात 

आपल्याला याबाबत पुरेशी माहिती नसल्याने आपण अमुक एका कारणाने पाठदुखी होत असेल असा तर्क लावतो आणि दुखणे सहन करत राहतो. पाठ आणि कंबर दुखण्यामागे शरीरात ठराविक जीवनसत्त्वांची कमतरता हेही महत्त्वाचे कारण असते. तेव्हा याबाबत योग्य ती माहिती घेणे आणि पाठदुखी अंगावर न काढता त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हे दुखणे वाढते आणि भविष्यात ते जास्त गंभीर होऊन बसते. पाहूयात कोणत्या २ कमतरता पाठीच्या दुखण्याचे महत्त्वाचे कारण ठरु शकतात.

१. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता 

आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर पाठ किंवा कंबरदुखी उद्भवू शकते. रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे व्हिटॅमिन बी १२ चे मुख्य काम असते. शरीरातील एनर्जी कायम ठेवण्यासाठी या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. मात्र शरीरात एनर्जी कमी असेल, आणि बी १२ चीही कमतरता असेल तर कंबरदुखीची तक्रार उद्भवू शकते. 

२. व्हिटॅमिन डी ची कमतरता 

हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कॅल्शियम शोषले जात नाही. कॅल्शियम शरीरात शोषले गेले नाही तर हाडे आणि पर्यायाने पाय, पाठ, खांदे असे सगळे अवयव दुखतात. म्हणूनच पाठदुखी होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन आणि पर्यायाने कॅल्शियमची कमी असण्याची शक्यता असते. 

म्हणूनच आहाराच सर्व प्रकारची खनिजे, व्हिटॅमिन्स यांचा समावेश राहील याची काळजी घ्यायला हवी. यासाठी सर्व भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी यांचा आहारात समावेश करायला हवा. तर व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आवर्जून ऊन्हात बसायला हवे. तसेच कॅल्शियमसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी यांचा आहारात समावेश वाढवायला हवा. 

मागील बातमी
चीनकडे आली 6 व्या जनरेशनची फायटर
पुढील बातमी
मनात नाही ठेवायचं ‘घडा घडा बोलायचं’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित बातम्या