अभिजित दीपकेंच्या निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टी'च्या कोअर कमिटी बैठक सुरू; '६ ऑगस्टला पत्रकार परिषदेत होणार निर्णयांची घोषणा, राजकीय वर्तुळाचे लक्ष

by Team Satara Today | published on : 05 August 2026


छत्रपती संभाजीनगर: 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या (CJP) मुख्य सदस्यांची महत्त्वपूर्ण दोन दिवसीय कोअर कमिटी बैठक आज, बुधवार (दि. ५) छत्रपती संभाजीनगरातील सिडको वाळूज महानगर येथील पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे. ५ आणि ६ ऑगस्ट रोजी चालणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीत देशभरातील विविध अभियानांबाबत मोठे निर्णय घेतले जाणार असल्याने राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.

सोनम वांगचूक आमचे मेंटर; आंदोलकांना वैद्यकीय व कायदेशीर मदत

माध्यमांशी बोलताना संस्थापक अभिजित दीपके म्हणाले, "सोनम वांगचूक सर आमचे मेंटर आहेत आणि राहतील, त्यांची तब्येत सध्या सुधारत आहे. देशात CJP एक प्रभावी प्रेशर ग्रुप (Pressure Group) म्हणून काम करत आहे. झारखंड येथील विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे असून त्यांना लागणारी सर्व मदत दिली जाईल. दिल्लीसह देशभरात जिथे जिथे आंदोलने झाली, त्या आंदोलकांवरील एफआयआर (FIR) रद्द करण्यासाठी आणि त्यांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी आमची टीम काम करत आहे."

स्वायत्त संस्थांचा विश्वास अन् बेरोजगारीवर महामंथन

या दोन दिवसीय परिषदेत पक्षाच्या आगामी वाटचालीवर आणि संघटनात्मक बळकटीवर सविस्तर चर्चा होणार आहे. याशिवाय देशातील निवडणूक आयोग, न्यायालये व विविध शासकीय कार्यालये या स्वायत्त संस्थांवरून जनतेचा उडालेला विश्वास, देशातील भीषण बेरोजगारी, आर्थिक संकट आणि ई-२० (E-20) धोरण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाचे सर्व प्रमुख सदस्य आपल्या नवीन कल्पना आणि उपक्रम मांडणार आहेत.

६ ऑगस्टला पत्रकार परिषदेत होणार निर्णयांची घोषणा

या बैठकीसाठी दिल्लीहून CJP ची प्रमुख टीम छ. संभाजीनगरात दाखल झाली असून, यात आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह सात प्रमुख सदस्य सहभागी झाले आहेत. गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारपर्यंत दोन दिवसीय बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची आणि आगामी कार्ययोजनेची सविस्तर माहिती माध्यमांना दिली जाणार असल्याचे दिपके यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा बारामतीत निषेध; राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलन
पुढील बातमी
'सरकारकडून मराठा समाजाचा छळ'; कुणबी जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणांवरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल

संबंधित बातम्या