भारत जगात सर्वोत्तम ह्युमन रिसोर्स देणारा देश ठरेल : शैलेंद्र देवळाणकर

सातारा : सर्वांत जास्त अनुदानित महाविद्यालये असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदी महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले आहे. देशात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाली असून कौशल्याच्या जोरावर भारत जगात सर्वात ह्युमन रिसोर्स देणारा देश ठरणार आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.

पै. इस्माईलसाहेब मुल्ला पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार’ वितरणप्रसंगी ते बोलत होते. यंदाचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार’ भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे होते. यावेळी व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.

चंद्रकांत दळवी म्हणाले, सातारा येथे रयत शिक्षण संस्था स्थापन केल्यावर सुरुवातीला अण्णांचेच घर हे वसतिगृह होते. कर्मवीरांनी गरीब, होतकरु अशीच मुले निवडली आणि वसतिगृहात आणून असंख्य विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम केले. त्यातीलच एक इस्माईलसाहेब मुल्ला असून संस्थेसाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे. डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, मला अनेक पुरस्कार मिळाले पण रयत शिक्षण संस्थेचा ‘इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार’ हा अतिशय भावनिक व मनाला समाधान देणारा आहे. रयतमध्ये त्याग व निस्वार्थ सेवा हा उत्तम संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. आभार प्राचार्या डॉ. वैशाली जाधव यांनी मानले.

मागील बातमी
श्री क्षेत्र काळूबाईदेवी यात्रेसाठी यंत्रणांनी समन्वयाने जबाबदाऱ्या पार पाडाव्यात : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
लाडकी बहिण योजनेच्या निकषात बदल नको

संबंधित बातम्या