सातारा : कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावात पारधी समाजाच्या वास्तव्यासंदर्भात व ॲट्रोसिटी कायद्यातर्गत दाखल गुन्ह्यांमुळे तणाव निर्माण झाला असून, पारधी समाजाचे इतरत्र पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यात्रेदरम्यान झालेल्या वादानंतर गावातील तीन युवकांवर (त्यात सरपंच व पोलीस पाटलांच्या मुलाचा समावेश) ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले असून, आणखी नावे वाढवण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेवडी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दहा वर्षांत गायरान जमिनीत पारधी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, बेकायदेशीर वास्तव्यासह चोरी व गुन्हेगारीच्या घटनांमुळे शेती व सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी सखोल व निष्पक्ष तपासाची मागणी करत, दोषी आढळल्यास कारवाई मान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. या निवेदनावर माजी सरपंच नंदराज मोरे, सौरभ नेवासे, दत्तात्रय आवाडे, सरपंच निलेश मोरे, कैलास आवारे, शौकत मुलाणी, शिवाजी दरेकर, परशुराम मोरे, नितीन आवारे, प्रतीक भोसले आदींच्या स्वाक्षरी आहेत.