बहुचर्चित सिनेमा 'छावा' वादाच्या भोवऱ्यात

चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही मंत्री उदय सामंत यांचा इशारा

मुंबई : अभिनेता विकी कौशलचा बहुचर्चित सिनेमा 'छावा' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या डान्सवर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. आता या संदर्भात महायुती सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी भूमिका जाहीर केली आहे. 

मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून म्हटलंय की, धर्मरक्षक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहे. मात्र या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याबाबत अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा त्याशिवाय प्रदर्शित करू नये अशी आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी तातडीने या बाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी निर्मात्यांना दिला आहे. त्यामुळे छावा सिनेमा रिलीज होण्याआधीच वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ट्रेलरमधील दृश्यावरून वादाला तोंड फुटण्याआधीच निर्मात्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं. छत्रपती संभाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाला कुठेही गालबोट लागू नये ही प्रत्येक शिवप्रेमींची इच्छा आहे. स्वराज्यरक्षक ही मालिका मी केली तेव्हा कोण कोणत्या दिव्यातून जावं लागलं ही कल्पना मला आहे. संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणण्यासाठी अनेकांचे फार मोठे योगदान आहे. करमणूक आणि व्यावसायिकासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर आणून त्यात वाद होऊ नयेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रपट बनवणं सोप्पं नाही. मराठीत अशाप्रकारे इतक्या बजेटचा सिनेमा येऊ शकत नाही कारण त्याला व्यावसायिक कारणे आहेत. प्रत्येक निर्मात्यांची नैतिक जबाबदारी असते. महापुरुषावर आपण सिनेमा करतो, तर त्यात केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहता येत नाही. आपण समाजाचं काही देणे लागतो ही कृतज्ञता कायम असली पाहिजे असं सांगत अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उदय सामंत यांच्या भूमिकेचं समर्थन केले आहे.

मागील बातमी
सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील सर्व खाते प्रमुख यांना सोबत घेऊन जिल्हा विकासाचे रोल मॉडेल बनवू : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
खंडाळा जि. प. शाळेत मुकुल माधव फाउंडेशनचे आरोग्य तपासणी शिबिर

संबंधित बातम्या