२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा अंधेरीतील मुव्हीमॅक्स सिनेमागृहात पार पडला. यावेळी विनय सहस्रबुद्धे, महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, व्यवस्थापकीय संचालक संदीप मांजरेकर, संचालक डॉ. संतोष पाठारे, ज्युरी मेंबर मंजुळ बरुआ आदी उपस्थित होते. यावेळी लेखक अनिल झडकर यांना सुधीर नांदगावकर मेमोरिअल अवॉर्ड, तर फिल्म सोसायटी ॲक्टिव्हीस्ट रफिक बगदादी यांना सत्यजित रे अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
२१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवामध्ये रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडले. सुमारे ६० चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. यंदाच्या महोत्सवात ‘जिप्सी’ चित्रपटाने बाजी मारली. याच चित्रपटासाठी शशी खंदारे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. अभिनेता मंगेश आरोटे यांनी ‘जिप्सी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.श्रद्धा खानोलकर हिला ‘भेरा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ‘छबिला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल भालेराव आणि ‘सिनेमॅन’ या चित्रपटासाठी अभिनेता पृथ्वीराज चव्हाण यांना विशेष ज्यूरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.