पुसेगाव : लष्करी सेवेमध्ये देशभक्ती, सन्मान, शौर्य व पराकोटीचा पराक्रम गाजवण्याची संधी मिळते. लष्करी सेवा ही केवळ नोकरी नसून मानसन्मान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपजत असलेल्या गोष्टीत नैपुण्य मिळवून लष्करातील विविध नोकरीच्या संधी शोधाव्यात. तसेच देशसेवेकरीता युवकांनी स्वतःला झोकून द्यावे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त एअर मार्शल अरुण गरुड यांनी व्यक्त केले.
येथील श्री सेवागिरी महाराज मंदिरात सैनिक शाळा सातारा माजी विद्यार्थी संघटना आणि डी. एन. जाधव फाउंडेशन पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने "सैनिक शौर्याचा गौरव-एक गौरवशाली प्रवास आणि संधी" या प्रेरणादायी कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
सेवानिवृत्त व्हॉइस ऍडमिरल सुनील भोकरे, सेवानिवृत्त लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल जगदीश चौधरी, सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल रणजीतसिंह नलावडे यांनी भारतीय सेनेतील त्यांच्या गौरवशाली प्रवासाविषयी व सेनादलातील नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्वतःचा जीवनप्रवास उलगडून सांगितला.
याप्रसंगी मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, फाउंडेशनचे विश्वस्त तथा ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर, कार्यकारी समिती सदस्य राजेश देशमुख, सचिव श्रीधर जाधव, विविध हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे चेअरमन माजी कामगार आयुक्त सुरेश जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मोहनराव गुरव व सिद्धी देशमुख यांनी केले. आभार प्रकाश कदम यांनी मानले