गोंदवलेत आढळला भारतीय उपखंडातील अतिशय विषारी 'पोवळा' साप

by Team Satara Today | published on : 12 September 2024


दहिवडी : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे भारतीय उपखंडातील सर्वात अतिशय विषारी व दुर्मिळ असा ‘पोवळा’ साप आढळला आहे. येथील शार्दूल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ हा साप आढळला. Slender Coral Snake असे शास्त्रीय नाव असलेल्या या सापास मराठीमध्ये ‘पोवळा’ साप असे म्हटले जाते.

विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा हा साप सहसा दृष्टीस पडत नाही. तो करंगळी एवढा जाड असतो. जर हा साप घाबरला, तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देतो. पोवळा हा वाळ्यासारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे.

या सापाचे विष मज्जा संस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिसतात. चावलेल्या भागात वेदना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येण्याची शक्यता असते. या सापाबद्दल माहिती देताना किरकसालचे सुपुत्र वन्यजीव अभ्यासक चिन्मय सावंत म्हणाले की पोवळा हा भारतातील सर्वात छोटा विषारी साप आहे. याचे शरीर फारच सडपातळ असते. गुळगुळीत खवले, काळे डोके कधी कधी डागाळलेले.

तपकिरी शरीर, शेपटी जवळ काळा कडा, चमकदार काळी शेपटी आणि निळसर खालची बाजू असते. मध्य आणि उत्तर-पश्चिम भारत वगळता संपूर्ण भारतात आढळतो. सर्व आशियायी कोरल सापांप्रमाणे, हा जंगल अधिवासात वावरतो आणि डोंगराळ भागातील वनांमध्ये आढळतो. स्वरक्षणासाठी तो वेटोळे घालतो आणि आपली चमकदार रंगीत शेपटी हलवतो. ज्यामुळे लक्ष त्याच्या डोक्यापासून दूर जातं.

कुकुडवाडचे सुपुत्र निसर्ग मित्र अजित काटकर म्हणाले, की हा साप जास्त करून जमिनीखाली, दगडांखाली किंवा पाचोळ्ळ्यात आढळून येतो. या सापाची जास्तीत जास्त लांबी एक फूट दोन इंच एवढी असते. हा साप जरी विषारी असला, तरी त्याचा छोटा आकार आणि छोट्या, तसेच किंचित आत वळलेल्या दातांमुळे तो माणसाला चावू शकत नाही, तसेच या सापामुळे माणूस किंवा इतर जनावरे वगैरे दगावल्याची नोंद नाही.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधानसभेतसुद्धा  अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल : मनोज जरांगे
पुढील बातमी
रायगड जिल्ह्यातील एमआयडीसीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट

संबंधित बातम्या