अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; विमान अपघातात दुर्दैवी निधन

by Team Satara Today | published on : 29 January 2026


तरडगाव : तरडगाव येथील सुपुत्र तथा महाराष्ट्र पोलीस दलातील जवान विदीप दिलीप जाधव यांचे अजितदादा पवार यांच्यासोबत प्रवास करत असताना झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. आज त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे तरडगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

विदीप दिलीप जाधव यांची २००९ साली मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. सेवाकाळात त्यांनी विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. काही काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावले. पुढे अजितदादा पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा ते सहकाऱ्यांकडे नेहमी व्यक्त करत असत. त्यांची ही इच्छा २०१९ साली पूर्ण झाली, तेव्हा विदीप जाधव यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ते अत्यंत निष्ठेने व जबाबदारीने सेवा बजावत होते.

आज कर्तव्यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. सकाळी मुंबई येथील निवासस्थानावरून बारामतीकडे विमानाने अजितदादा पवार यांच्यासोबत ते रवाना झाले होते. मात्र, प्रवासादरम्यान झालेल्या विमान अपघातात विदीप जाधव यांचे प्राण गेले.

 त्यांच्या घरी मन हेलावून टाकणारे दृश्य

या घटनेची माहिती मिळताच तरडगाव येथील त्यांच्या घरी मन हेलावून टाकणारे दृश्य दिसून आले. कुटुंबीयांचा आक्रोश, नातेवाईक व ग्रामस्थांची गर्दी, आणि शोकमग्न वातावरणाने संपूर्ण गाव सुन्न झाले. कर्तव्यावर असताना प्राण अर्पण करणाऱ्या या निष्ठावंत पोलीस जवानाच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक शिस्तप्रिय व निडर रक्षक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सर्व स्तरांतून तीव्र संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केळघर घाटातील नाल्यात मालवाहू ट्रक कोसळून चालकाचा जागीच मृत्यू ; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
पुढील बातमी
अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कोरेगाव १०० टक्के बंद; संपूर्ण शहरात शोककळा

संबंधित बातम्या