सातारा : माची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मुजमील हमीद पालकर वय 40 रा. गुरुवार परज असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटाची तीव्रता इतकी होती की लगतच्या काही घरांचे नुकसान होऊन चिकन दुकानासमोरील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या काचा फुटल्या. अचानक झालेल्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन तत्काळ तपास सुरू केला. या तपासासाठी बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या व जखमींची चौकशी केली.
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला साताऱ्यात भीषण स्फोट झाल्याने त्याचा आवाज केसरकर पेठ तसेच यादोगोपाळ पेठ परिसरापर्यंत गेला. शाहू चौक ते बोगदा रस्त्यावर (११/४६ शनिवार पेठ) पालकर यांचे चिकनचे दुकान आहे. या दुकानाला अगदी खेटून सर्व्हिसिंग सेंटर आहे. दुपारी सव्वा एकच्या दरम्यान या दुकानात अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की लगतच्या घरांच्या भिंती हादरल्या व शेजारील इमारतीतील घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली. हा स्फोट इतका भीषण होता की चिकन व्यावसायिक पालकर सुमारे दहा फूट हवेत फेकले जाऊन रस्त्यावर आदळले. या स्फोटात गंभीर जखमी झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला, तर हरून बागवान वय 30 व उमर बागवान वय 25 हे दोघे येथील प्रार्थना स्थळाकडे नमाज पडण्यासाठी जात होते. भीषण स्फोटामुळे ते जखमी झाले.
स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांची काही काळ पळापळ झाली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी सुरू झाली. माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, धनंजय जांभळे तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने तेथील सामान हलवण्यास सुरुवात केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपाधीक्षक अतुल सबनीस, पोलीस निरीक्षक संदीप सावंत तसेच बॉम्बशोधक पथकाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व पंचांच्या समक्ष तेथील घटनास्थळावरील वस्तूंची तपासणी सुरू झाली. या स्फोटाची भीती नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. लगतच्या सर्व्हिसिंग सेंटर चा पत्रा उध्वस्त झाला, तर काही घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली. प्रार्थना स्थळालगतच्या एका घराची भिंत पडल्याची माहिती मिळत आहे, मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. या प्रकरणात स्फोट नक्की कोणत्या वस्तूचा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. बॉम्बशोधक पथक आणि सातारा शहर पोलीस कसून त्या वस्तूचा शोध घेत आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले स्फोटाचे वृत्त कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची चौकशी केली. यासंदर्भात तातडीने तपास करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.