पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम कंपनीच्या आडमुठेपणामुळे ठप्प

by Team Satara Today | published on : 22 October 2024


सातारा : नागठाणे, ता. सातारा येथील पुणे-बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम दोन महिन्यांपासून बंद आहे. ठेकेदार कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे हे काम ठप्प झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. काम ठप्प झाल्याने नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ पुलाचे काम न झाल्याने 60 गावांमधील लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. एकीकडे इतर ठिकाणी सहापदरीकरणाचे काम जोमात सुरू असताना नागठाणे येथे मात्र कोणतीच हालचाल नाही. त्यामुळे लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम सुरू करावे; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

नागठाणे ही सातारा तालुक्यातील सर्वात मोठी विकसित होणारी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी शेंद्रे व बाँबे रेस्टॉरंट यासारखा उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. नागठाणे गावाला पाटण, कराड तालुक्यातील मोठी गावे जोडली गेली आहेत. तसेच येथून रोज लाखो लोकांची रोजची ये-जा असते. नागठाणे व पाटण परिसरातील शेतकरीवर्गाचा ऊस तसेच शेतीमाल सातारा व परिसरातील साखर कारखान्यांना ट्रॅक्टर व ट्रक व बैलगाड्यांच्या साह्याने या चौकातून वाहतूक केली जाते. उड्डाणपूल नसल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. महामार्गाच्या पूर्वेला नागठाणे येथील शाळा व महाविद्यालय आहे. या ठिकाणी नागठाणे, पाडळी, निनाम, मांडवे, सासपडे, तारळेसह अन्य गावांतून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी नागठाणेत येतात. गावातील नागठाणे चौक हा एकमेव दळणवळणाचा पर्याय आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी
पुढील बातमी
जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

संबंधित बातम्या