सातारा : महिलेशी व्हॉट्सअपवर ओळख झाल्यानंतर ती ओळख वाढवून संमतीने शरीरसंबंध केल्यानंतर महिलेसह चौघांच्या टोळीने सेंट्रींग काम करणार्याचे अपहरण केले. यानंतर बेदम मारहाण करत 3 लाख रुपयांची खंडणी उकळली. दरम्यान, सातार्याजवळ घडलेल्या या हनी ट्रॅप प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 10 फेब्रुवारी रोजी घडली आहे. तक्रारदार पुरुष सातार्यात सेंट्रींगची कामे घेतो. तो अनोळखी महिलेच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्कात आला. महिलेची ओळख वाढवल्यानंतर सेंट्रींगचे काम देतो, असे महिलेला सांगितले. यासाठी पेट्री गावच्या हद्दीत काम असल्याचे सांगून ते दाखवण्यास नेले. साईटचे काम पाहून झाल्यानंतर कासला जावू, असे ठरल्यानंतर एकीव फाट्यानजीक लॉजमध्ये दोघेही गेले. तेथे दोघांच्या संमतीने शरीरसंबंध झाले. तेथून दोघेही पुन्हा कारने पेट्री फाट्यानजीक आल्यानंतर महिलेने तिच्या चार साथीदारांना बोलावून घेतले.
संशयित चौघेजण कारजवळ आल्यानंतर त्यांनी तक्रारदाराचे अपहरण केले. कारमध्ये मारहाण करत तेथून वेचले ता.सातारा गावच्या हद्दीत एका खोलीत डांबून ठेवले. याठिकाणी पुन्हा मारहाण करत ‘आमच्या बहिणीला लॉजवर घेवून जाण्याची तुझी हिम्मत कशी झाली. तुला जिवंत ठेवत नाही. तू आम्हाला पैसे दे. नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो,’ असे म्हणत ब्लॅकमेल केले. 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्यानंतर तक्रारदार याने पत्नीला फोन करुन 3 लाख रुपये मागवून घेतले. संशयितांनी ते पैसे घेतले. तसेच आणखी 2 लाख रुपये दिले नाही तर रेपच्या केसमध्ये अडकवीन. तसेच व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.
तक्रारदाराची सुटका झाल्यानंतर ठरवून अपहरण, खंडणी व हनी ट्रॅप झाल्याचे लक्षात आले. यामुळे तक्रारदार याने सातारा तालुका पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर महिलेसह अनोळखी चौघांच्या टोळीवर अपहरण, मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गुरव करीत आहेत.