सातारा : कास रस्त्यावरील एकीव चौकालगत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर पर्यटकांची कार आदळून भीषण अपघात झाला. अपघातानंतर जखमींना सातार्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास महेश मारुती पिसाळ (रा. इंदिरानगर, विलासपूर, ता. सातारा) हे कार चालवत असताना वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार धडकली.
या अपघातात राहुल अण्णा ननवरे (रा. कारंडवाडी, पोस्ट देगाव, ता. सातारा) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वैभव किसन जाधव (रा. सासपडे, ता. सातारा) आणि चालक महर्षी पिसाळ यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघात घडलेले ठिकाण काहीसे निर्जन असल्याने सुरुवातीला जखमींना मदत मिळण्यात अडचणी आल्या. परंतु, काही वेळानंतर त्या मार्गावरून जाणार्या इतर पर्यटकांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखत गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अपघातग्रस्तांना गाडीतून बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका व खासगी वाहनांच्या मदतीने सातारा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातस्थळाची पाहणी करून सविस्तर पंचनामा केला. कारचा चक्काचूर झाल्यामुळे ती रस्त्याच्या कडेलाच अडकून पडली होती, वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार घटनास्थळावरून हटवून पोलीस ठाण्यात आणली आहे. सातारा तालुका पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.