सातारा : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे नद्या व तलावांत विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पालिकांनी कृत्रिम तलाव व ग्रामपंचायतींनी जलकुंड गणपती विसर्जनासाठी तयार केले आहेत. त्यामध्येच सार्वजनिक गणेश मंडळांनी व नागरिकांनी गणपती विसर्जित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
गणेशोत्सवात जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. शेंद्रे (ता. सातारा) आणि इंदोली (ता. कऱ्हाड) येथे संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी आशिष बारकुल, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे उपस्थित होते.
जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड तयार केले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, ‘‘तयार करण्यात आलेल्या जलकुंडांत नागरिकांनी आपले घरगुती गणपती विसर्जित करावेत. गणपती सजावटीसाठी प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हे प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने सोय केली आहे. काही गावांतील गणपतीची मूर्ती दान करण्याचा निर्धार केला आहे.
दान केलेल्या गणपती व्यवस्थित ठेवून त्याचा पुनर्वापर करावा. शाडू मातीच्या मूर्ती पाण्यात सहज विरघळल्याने नद्या व तलाव प्रदूषित होत नाही. सामूहिकरीत्या साजरा केलेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव नागरिकांमध्ये एकोपाही वाढवतो आणि श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टी साधल्या जाऊ शकतात. शेंद्रे व इंदोली येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेमार्फत गणपती विसर्जनासाठी करण्यात आलेल्या सोयीबद्दल समाधान व्यक्त करून हा उपक्रम राज्यात आदर्शवत ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला.